अमल महाडिक भाजपचे उमेदवार; कोल्हापूर विधान परिषदसाठी नाव निश्चित | पुढारी

अमल महाडिक भाजपचे उमेदवार; कोल्हापूर विधान परिषदसाठी नाव निश्चित

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापुरातून भारतीय जनता पक्षाने अखेर माजी आ. अमल महाडिक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. आठ दिवसांपासून भाजपच्या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यामुळे निवडणुकीतील रंगत आता वाढली असून, गाठीभेटींना जोर येणार आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये उमेदवारीची चर्चा सुरू झाली, तेव्हा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी आ. सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची नावे चर्चेत होती. या सर्वांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. चर्चेच्या फेर्‍या झाल्या, तशी यातील काही नावे गळाली.

शौमिका महाडिक यांच्या नावावर जवळपास एकमत झाले होते. परंतु, महाडिक कुटुंबात उमेदवारीबाबत चर्चा झाल्यानंतर अमल महाडिक यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचे ठरले. परंतु, पक्षीय पातळीवर शौमिका महाडिक यांच्याच नावाची चर्चा होती. त्यामुळे आठ दिवसांपासून भाजपची उमेदवारी शौमिका की अमल महाडिक यांना, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यात विधान परिषदेच्या कोल्हापूरच्या जागेसाठी माजी आ. अमल महाडिक, तर धुळ्याकरिता अमरिश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नावांची अधिकृत घोषणा पक्षाच्या दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडून दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

पाटील-महाडिक सामना रंगणार

सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आहे. सोबतीला राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आहेत. शिवाय, प्रमुख सहकारी संस्था या दोघांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार कोण? याची चाचपणी भाजपकडून सुरू होती. काही नावे पुढे आली; परंतु मंत्री पाटील यांच्याविरुद्ध महाडिक हेच नाव सक्षम आहे, असे ग्राह्य धरून भाजपच्या कोअर कमिटीने महादेवराव महाडिक व भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करून अमल महाडिक यांचे नाव निश्चित केले.

Back to top button