पुणे ड्रग्ज प्रकरण : ससूनच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना हटवले

पुणे ड्रग्ज प्रकरण : ससूनच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना हटवले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना हटवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांना दणका देत त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरण डॉ. ठाकूर यांच्या अंगाशी आल्याचे बोलले जात आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची १३ जानेवारी रोजी पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. काळे यांनी या निर्णयाविरोधात 'महाराष्ट्र अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल'ने (मॅट) कडे दाद मागितली होती. मॅटने १४ जुलै रोजी डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, डॉ. ठाकूर यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत आज हायकोर्टाने चार महिन्यांनी निकाल देत डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करत त्यांना दणका दिला आहे.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेच ड्रग तस्कर ललित पाटीलवर उपचार करत होते. पाटीलला ससूनमध्ये ठेवण्याची शिफारसही डॉ. ठाकूर यांनीच कारागृहाला पत्राद्वारे केल्याचे स्पष्ट झाले. राज्य शासनाच्या चौकशी समितीने अहवालात ससून प्रशासनावर ठपका ठेवला असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकूर यांची बदली किंवा निलंबन होणार, हे स्पष्ट झाले होते. डॉ. ठाकूर यांच्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीकाही होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने त्यांची नियुक्ती रद्द केल्याचा निकाल दिला आहे.

'मॅट'चा निकाल माझ्या बाजूने लागल्यावर मुंबई हायकोर्टात त्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली. शुक्रवारी अंतिम सुनावणी पार पडली आणि कोर्टाने अंतिम निर्णय दिला. आता पुढील नियुक्तीची ऑर्डर शासनाकडून लवकरच काढला जाईल.

– डॉ. विनायक काळे, माजी अधिष्ठाता, ससून रुग्णालय

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news