सातारा; पुढारी वृत्तसेवा : संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी राजधानी सातार्यासह जिल्ह्यात भगवे वादळ उठले. राजधानी सातार्यात मराठा बांधवांचा महासागर उसळल्याने सर्वत्र वीरश्री संचारली. जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. माण तालुक्यातील गोंदवले येथे संतप्त आंदोलकांनी एस.टी. बस फोडली असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला. सर्वत्र बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या. मोर्चे, निदर्शने, चक्काजाम करण्यात आला. 'एक मराठा, लाख मराठा' आरोळी जिल्हाभर घुमली.
सकल मराठा समाज बांधवांच्या आंदोलनाने राजधानी सातार्यासह अवघा जिल्हा थबकला. जनजीवन पूर्णत: ठप्प झाले. सातार्याबरोबरच वाई, माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, कराड, पाटण, जावली या तालुक्यांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याने जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडले. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, असा एल्गार जिल्हाभर आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा घुमला.
सातार्यात निदर्शने व रॅली काढून सरकारचा निषेध नोंदवला. सातारा शहर परिसरासह उपनगरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहर व परिसरातील सर्वच दुकाने बंद होती. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह व्यापारी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी आ. शिवेंद्रराजेंनी भेट देऊन मराठा आरक्षणप्रश्नी आपली भूमिका मांडली. कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात मराठा समाजाचा घटक म्हणून मी माझी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ मांडेन, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलकांना दिली.
माण तालुक्यात बंदला हिंसक वळण लागले असून, गोंदवले बुद्रुक येथे आंदोलकांनी एका एस.टी.बसवर दगडफेक करत काचा फोडल्या.
तर दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर मार्डी व गोंदवले बुद्रुक येथील सुमारे 115 जणांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदवला. दहिवडीसह गोंदवले बुद्रुक, मार्डी, रानंद व शिखर शिंगणापूर आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
बंदच्या हाकेला वाई तालुक्यात प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडक बंद पाळल्यानंतर सायंकाळी मशाल मोर्चा काढण्यात आला. हा मशाल मोर्चा गणपती घाट, चित्रा टॉकीज मार्गे किसनवीर चौकातून नवीन कृष्णा पुलावरून आंदोलन स्थळी तहसील कार्यालयावर काढण्यात आला. खंडाळा तालुक्यातही बंदला प्रतिसाद मिळाला. खंडाळा व शिरवळमध्ये बाजारपेठा ओस पडल्या. मात्र, लोणंद परिसरातील व्यवहार सुरळीत होते.
खटाव तालुक्याने मंगळवारी कडकडीत बंद पाळून सक्रिय सहभाग नोंदवला. वडूज, मायणी, खटाव, पुसेगावसह सर्वत्र बाईक रॅली, कँडल मार्च काढून आरक्षणाची मागणी केली. तालुक्यातील 63 हून अधिक गावांमध्ये राजकारण्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
फलटण शहर तसेच तालुक्यातील साखरवाडी, बरड, आसू, सांगवी, वाखरी, राजाळे, गिरवी, गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर फलटण एसटी आगाराने एकही एसटी न सोडल्याने सर्व एसट्यांची चाके जाग्यावरच थांबली.
जावली तालुक्यातही मेढा, सायगाव, कुडाळ, करहर परिसरात कडकडीत बंद पाळला. गाढवांच्या गळ्यात राज्यातील नेतेमंडळींची प्रतिमा अडकवण्यात आली. बसेसवरील नेत्यांच्या जाहिरातींना काळे फासण्यात आले.
कोरेगाव तालुक्यातही कडक बंद पाळण्यात आला. कोरेगाव, रहिमतपूर व तालुक्याच्या उत्तर भागातील ग्रामीण भागात सर्वत्र शुकशुकाट होता. जिल्हाबंदवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी आर्वीच्या तीन तर हासेवाडीच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला. तसेच तारगावात रात्री कॅण्डल मार्च काढला. जिल्ह्यात सर्वत्र मोर्चे, रस्तारोको झाला. दरम्यान, महाबळेश्वर येथे बुधवारी बंद पाळण्यात येणार आहे.