Jalgaon Crime : स्कॉर्पिओमध्ये तीन गावठी पिस्तूल, चार काडतूस; तिघांना घेतलं ताब्यात | पुढारी

Jalgaon Crime : स्कॉर्पिओमध्ये तीन गावठी पिस्तूल, चार काडतूस; तिघांना घेतलं ताब्यात

जळगाव : खडका गावातील गिरीश देविदास तायडे हा त्याच्या साथीदारांसह स्कॉर्पिओ कारमध्ये तीन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दोन पिस्टलमध्ये दोन बुलेट, लोखंडी कोयता, तीन मोबाईल आणि सहा फायबरचे राड घेऊन येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला आणि तीघांना अटक केली. मुख्य संशयित गिरीश देविदास तायडे हा मात्र फरार झाला.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आवाडे यांना गुप्त माहिती मिळाली की खडका गावातील गिरीश देविदास तायडे हा त्याच्या साथीदारांसह स्कॉर्पिओ कार क्रमांक एम एच 19 डी व्हीं 2333 या गाडीमधून येणार असून त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व इतर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर आरोपीला अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, सुनील जोशी, विजय नेरकर, रमण सुरळकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, सचिन चौधरी, जावेद शहा, प्रशांत परदेशी आणि योगेश माळी यांना आरोपीला ताब्यात घेण्याचे सांगितले.

खडका चौफुली येथे पोलिसांनी सापळा लावला. पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ कार येत असताना वाहनाच्या चालकाने पोलिसांना पाहताच भरधाव वेगाने खडका गावाच्या दिशेने गाडी पळवली. पोलिसांनी पाठलाग केला असता खडका गावाच्या शहरात आरोपी गिरीश देविदास तायडे यांच्या धाब्यावर संशोधन वाहन थांबून वाहनातील चारही आरोपी गाडी सोडून पडत असताना धीरज प्रकाश सोनवणे, मुकेश जयदेव लोंढवाल आणि संजय शांताराम कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर गिरीश देविदास तायडे हा फरार झालेला आहे. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दोन पिस्टलमध्ये दोन बुलेट, एक लोखंडी कोयता, तीन मोबाईल आणि सहा फायबरचे राड अशी शस्त्र मिळून आली.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सतरा तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

हेही वाचा :

Back to top button