अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची पोलिसाने उडविली खिल्ली | पुढारी

अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची पोलिसाने उडविली खिल्ली

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : एका भारतीय मुलीच्या मृत्यूची किंमत फक्त नऊ लाख रुपये असल्याचे छद्मी उद्गार अमेरिकेतील एका पोलिस अधिकार्‍याने म्हटले असून त्याची ही मुक्ताफळे रेकॉर्ड झाली आहेत.

अमेरिकेतील सिएटल येथे पोलिसांच्या गस्तीच्या गाडीने धडक दिल्याने जान्हवी कमदुला या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. यानंतर अपघाताची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकार्‍याने तिच्या मृत्यूची खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकार्‍याच्या कारचा व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल होत आहे.

यामध्ये तो म्हणत आहे की, भारतीय विद्यार्थिनीच्या जीवनाला मर्यादित मूल्य होते. अकरा हजार डॉलर्सचा एक चेक दिला तरी पुरे आहे. पोलिस अधिकारी विद्यार्थिनीच्या मृत्यूची चेष्टा करत होते, तेव्हा त्यांच्या गणवेशावर लावलेला कॅमेरा सुरू होता. त्यात सारे काही रेकॉर्ड झाले.

Back to top button