कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप | पुढारी

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शहरातील काही चौकांमध्ये पाणी साचून राहिल्याने चौकांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, राजाराम बंधारा दुपारी पुन्हा पाण्याखाली गेला.

शहरात दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची भुरभुर राहिली. थंड हवा आणि ढगाळ वातावरण असले तरी पावसाला जोर नव्हता. मात्र, चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे शहरातील व्हिनस कॉर्नर चौक, जनता बझार चौक या चौकांत पाणी साचले होते.

या पाण्यातून वाहनचालकांना वाट काढत जातानाचांगलीच कसरत करावी लागत होती. व्हिनस कॉर्नर चौकात ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्याच्या शेजारीच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचारी थांबलेले असतात. त्यांना या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या दोन्ही ठिकाणचे पाणी काढून त्या भागाची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

राजाराम बंधारा पाण्याखाली
कसबा बावडा : सोमवार सकाळी सातपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत तब्बल चार फुटांनी वाढ होऊन पाणी पातळी साडेसतरा फूट झाली. दुपारी दोनच्या सुमारास पंचगंगेचे पाणी बंधार्‍यावरून वाहू लागले.

यातून धोकादायकरीत्या वाहतूक सुरू राहू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कसबा बावड्याकडील बाजू बॅरिकेड लावून बंद करण्यात आली. सायंकाळी सात वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी साडेसतरा फूट इतकी होती.

पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावड्यात संततधार
पंधरा दिवसांच्या उसंतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा दमदार एंट्री केली आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांसह करवीर तालुक्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मृगाच्या पेरण्या झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने उन्हामुळे पिके धोक्यात आली होती. मात्र, सोमवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या भात रोप लावणीला आता पुन्हा वेग आला असून, शेतशिवारे गजबजून गेली आहेत.

गडहिंग्लज तालुक्यात रोप लावणीला वेग
गडहिंग्लज ः गडहिंग्लज तालुक्यात रविवारी रात्रीनंतर झालेल्या दमदार पावसाने रोप लावणीच्या कामाला वेग आला आहे. भात व सोयाबीनला आवश्यक असलेल्या पावसाची सुरुवात झाल्याने बळीराजाला खर्‍या अर्थाने दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर खतासाठी मात्र शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात पिकांची उगवणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. तब्बल पंधरा दिवसांहून अधिक काळ कडक ऊन पडल्याने पिके कोमेजण्याचा धोका निर्माण झाला होता.

आजरा तालुक्यात पावसाचा जोर वाढला
आजरा : तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून, रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत तालुक्यात 20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने ओढ दिल्याने भात रोप लावणीसह शेतीची कामे खोळंबली होती. पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने शेतकरी मंडळी भात रोप लावणीच्या नियोजनामध्ये गुंतली आहेत. आजरा मंडलमध्ये 21 मि.मी., मलिग्रे मंडलमध्ये 15 मि.मी., उत्तूर मंडलमध्ये 20 मि.मी., तर गवसे मंडलमध्ये 22 मि.मी. इतका पाऊस रविवारी झाला. तालुक्यात दि. 1 जूनपासून 671 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली
आहे.

भुदरगड तालुक्यात बळीराजा सुखावला
गारगोटी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर भुदरगड तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली होती. शेतकर्‍यांनी मोटारपंप, इंजिनच्या सहाय्याने पिकांना पाणी देणे सुरू केले होते. उन्हाच्या तडाख्यामुळे माळरानावरची पिके वाळू लागली होती. शेतकरी चिंतातूर बनला होता. रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सोमवारी दिवसभर समाधानकारक पावसाची हजेरी झाली. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता कमी झाली आहे.

Back to top button