पुणे: ‘हम एनडीए के कॅडेट्स हैं ‘ ची धून अन् परेड ! १४४ व्या कोर्सची ‘ पासिंग आउट परेड’ | पुढारी

पुणे: 'हम एनडीए के कॅडेट्स हैं ' ची धून अन् परेड ! १४४ व्या कोर्सची ' पासिंग आउट परेड'

पुणे, पुढारी वृत्तसेवा: लष्करी मैदानावर पहाटे पहाटे बिगुल वाजतो अन् तीन वर्ष लष्करी तालमीत तयार झालेले तरुण शिस्तबद्ध कवायती करत मैदानावर संचारतात. त्यांच्या पावलांच्या ठोक्यासह अगदी तालात वाजणारा बँड अन् उपस्थित जनसमुदायाच्या कानी पडणारे सुमधुर गीत…. ‘हम एनडीए के कॅडेट्स हैं’, ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा’ प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागे करत होते. हा सर्व प्रसंग आहे पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून (एनडीए) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ‘पासिंग आउट परेड’चा.

पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ‘पासिंग आउट परेड’ जनरल अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. १४४ वा कोर्स हा जून २०२० मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तीन वर्षांचे कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅडेट्स एका औपचारिक कार्यक्रमात उत्तीर्ण झाले. त्यावेळी चव्हाण यांनी परेडचे पुनरावलोकन केले.

परेडची मानवंदना स्वीकारल्यानंतर जनरल अनिल चव्हाण म्हणाले, लष्करी सेवेतील प्रवासाच्या वाटचालीचा पहिला टप्पा शिस्तबद्ध मेहनतीच्या जोरावर यशस्वीपणे पार केला आहे. देशसेवेसाठी आणखी काही करण्याचे ध्येय बाळगून काम केल्यास, त्याचा सर्वोच्च आनंद कधी कोणाला होत असेल, तर तो तुमच्या आई-वडिलांना. म्हणून भविष्यकाळ तुमचा असून आणखी कठोर परिश्रम करावे लागेल, असा सल्ला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना दिला. जनरल चव्हाण यांनी पुनरावलोकन अधिकाऱ्यांसह उत्तीर्ण कोर्स कॅडेट्स, पदक विजेते आणि चॅम्पियन स्क्वाड्रन यांचे कठोर परिश्रम आणि जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

परेड मध्ये ११७५ कॅडेट्सचा सहभाग

या परेडमध्ये एकूण ११७५ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यापैकी ३५६ कॅडेट्स पासिंग आऊट कोर्सचे होते. यामध्ये २१४ आर्मी कॅडेट्स, ३६ नेव्हल कॅडेट आणि १०६ एअर फोर्स कॅडेट्स आहेत. याशिवाय मैत्रीपूर्ण परदेशांमधील १९ कॅडेट्सचाही (भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश) यात समावेश आहे.

तिघांना मिळाले राष्ट्रपती पदक

आफ्रिद अफरोझने गुणवत्तेच्या एकूण क्रमाने प्रथम स्थान मिळवल्याबद्दल अध्यक्षांचे सुवर्णपदक जिंकले. अंशू कुमारने राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले तर प्रवीण सिंगने राष्ट्रपतींचे कांस्य पदक जिंकले. रोमियो स्क्वॉड्रनने प्रतिष्ठित ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ जिंकला, जो परेड दरम्यान सादर करण्यात आलेला चॅम्पियन स्क्वॉड्रन आहे.

लष्करी सेवेतील जवानांना ध्वजाची मानवंदना काय असते, याची सामान्यांना जाणीव परेड दरम्यान दिसली. १८ विविध तुकड्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांपुढे तीन कॅडेट्सनी अत्यंत सन्मानात ध्वज आणत परेडनंतर तेवढ्यात सन्मानात लष्करी जवानांच्या सुपूर्त केला. तत्पूर्वी कॅडेट्स जसजसे ध्वज घेऊन पुढे सरकत होते तसतसे उपस्थित ध्वजाच्या सन्मानार्थ उभे राहून मानवंदना देत होते.

तीन अधिकारी आणि मानवंदना

लष्करी परेड पाहताना रोमांच उभे राहावेत, असे काही प्रसंग कॅडेट्सच्या कवायती पाहून जागृत झाल्याचा अनुभव आला. सुरुवातीला एनडीएचे चीफ इन्स्ट्रक्टर मेजर जनरल संजू डोगरा, त्यानंतर वाई साईड मिरल अजय कोचर यांनी मानवंदना व सलामी स्वीकारली. यानंतर या दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांनी परेडचे मुख्य अतिथी जनरल अनिल चव्हाण यांचे स्वागत करीत मानवंदना देत सलामी दिली. या दरम्यान आकाशातून तीन चेतक हेलिकॉप्टरने तिरंगा फडकवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Back to top button