चालकाची डुलकी व टायर फुटल्याने 'समृद्धी'वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण | पुढारी

चालकाची डुलकी व टायर फुटल्याने 'समृद्धी'वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

समृद्धी महामार्गावर जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३५८ अपघातांची नोंद झाली असून, त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण गंभीर जखमी व २३६ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांच्या निरीक्षणानुसार सर्वाधिक अपघात चालकास डुलकी लागणे, वाहनांचे टायर फुटणे व वाहनांचा अतिवेग यामुळे झाले आहेत.

समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर अवघ्या सहा तासांत शक्य होत आहे. प्रशस्त महामार्ग असल्याने वाहनांचा वेगही प्रचंड असून, त्यामुळे अपघातांची शक्यताही वाढली आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरू आहे. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत महामार्गावर ३५८ अपघात झाल्याची नोंद असून, त्यात ३९ जणांचा जीव गेला आहे. तर ५४ गंभीर अपघातांमध्ये १४३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

१२७ अपघात छोट्या स्वरूपात झाल्याने २३६ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्याचप्रमाणे १५३ अपघातांमध्ये कुणीही जखमी झाले नाही. महामार्ग पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार सर्वाधिक अपघात वाहनचालकांना डुलकी लागल्याने किंवा सलग प्रवास करून थकवा आल्याने झाले आहेत. तर ८१ अपघात वाहनांचे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे वाहनांचे टाय फुटत असल्याची बाब पाहणीतून समोर आली आहे. ‘रोड हिप्नोसिस’ची शक्यता समृद्धी महामार्ग बहुतांश सर असून, वाहने चालवताना चालकांच्या नजरेत एकच रस्ता व परिसर येत असतो. महामार्गावर वळण नसल्याने चालकांचा सावधपणा दूर होतो त्यामुळेही अपघात होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यास ‘रोड हिप्नोसिस’ म्हटले जाते. त्यामुळे या कारणांचा शोध घेण्यासाठीही महामार्ग पोलिस प्रयत्न करीत आहेत.

रात्री ९ ते १२ या वेळेत भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर सर्वाधिक १०२ अपघात पहाटे ३ ते ६ या वेळेत झाले असून, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रात्री ९ ते १२ या वेळेत २७ अपघात झाले असून, त्यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावेळेत झालेल्या अपघातांची भीषणता सर्वाधिक दिसली आहे. त्याचप्रमाणे तर सकाळी ६ ते १२ या वेळेत ८९ अपघात झाले असून, त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळेत ९६ अपघात झाले असून, त्यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत ३९ अपघातांमध्ये सहा जणांनी जीव गमावला आहे.

अपघाताची कारणे        अपघाताची संख्या     अपघाती मृत्यू

टायर फुटणे                     81                           9

चालकास डुलकी               104                         9

पार्किंग, नादुरुस्ती             14                           1

वाहनांचा अतिवेग             72                           11

इतर कारणे                      74                            8

वाहनांमध्ये बिघाड            16                            0

रस्त्यात प्राण्यांचाव वावर     18                           1

Back to top button