नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर | पुढारी

नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीमध्ये दारूच्या, औषधांच्या फोडलेल्या बाटल्या, तुटलेल्या खुर्च्या, रुग्णांसाठी खराब पाणी तसेच इमारतीच्या फुटलेल्या काचा आणि रंगविलेल्या भिंती अशी परिस्थिती निदर्शनास आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची भिस्त ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर असते, त्या आरोग्य केंद्राची इमारत शेवटच्या घटका मोजत आहे. याकडे आरोग्य यंत्रणेचेही दुर्लक्ष असल्याने ग्रामीण-आदिवासी रुग्णांची गैरसोय होत आहे.

याबाबत दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी दिसून आल्या आहेत. या शासकीय इमारतीत पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि अन्य कचरा पाहिल्यानंतर हे आरोग्य केंद्र आहे की, एखादा ढाबा अशी शंका मनात आल्याशिवाय राहात नाही. येथे ठिकठिकाणी दारू आणि शीतपेयाच्या फुटलेल्या बाटल्या दिसून आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी औषधांच्या खराब बाटल्यादेखील येथील परिसरातच पडलेल्या आहेत. रुग्णांना तपासण्यासाठी असलेले बेड एका बाजूने पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. विशेष म्हणजे या इमारतीमधील एकही अशी खोली अशी आढळली नाही की, ज्यामध्ये रुग्णांची तपासणी होईल.

संबंधित आरोग्य पथक केंद्र हे आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. तेथील परिस्थितीबाबत मला काहीही कल्पना नाही. याबाबत माहिती घेऊन कळवतो. – डॉ. मोतीलाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, त्र्यंबकेश्वर.

गरज बायो-मेट्रिक्स हजेरीची
येथील आरोग्य अधिकारी – कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था नसल्याने जाण्या – येण्यावर कुणाचेही बंधन नाही. त्यामुळे हीच परिस्थिती ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश ठिकाणी आहे. त्यामुळे या आरोग्य पथकांना हजेरीचा धाक गरजेचा आहे.

मी या ठिकाणी एक वर्षापासून आहे. माझी पोस्टिंग होण्यापूर्वीपासूनच अशी परिस्थिती होती. आम्ही दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणी पाणी, वीज नाही तसेच सायंकाळी हिंस्र पशू असतात म्हणून येथे थांबता येत नाही. येथे येणारे पर्यटक येथील सर्व खराब करतात. – डॉ. जुन्नरे, आरोग्य पथकप्रमुख, कळमुस्ते.

उपचारासाठी जायचे कोठे…
गळणारे सिलिंग, तडे गेलेल्या भिंती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे असलेल्या टाकीत कचरा साचलेले पाणी एक महिला रुग्णांसाठी भरून घेत असल्याचे भयावह चित्र दिसून आले. याबाबत प्रतिनिधीने येथील आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित आरोग्य अधिकारी हे आठवड्यातून कधीतरीच उपलब्ध होत असल्याचे समोर आले. एकंदरीतच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सांभाळणारी केंद्रेच अशा प्रकारची असतील, तर ग्रामीण भागातील नागरिकांनी उपचारासाठी कुठे जायचे, असा प्रश्नच आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्ती प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, उपयोग झालेला नाही. तेथील परिस्थितीबाबत तालुका आरोग्य अधिकारी चांगल्या प्रकारे सांगू शकतील. या ठिकाणी दुरुस्तीसाठी पाहणी करून गेले आहेत, मात्र पुढे काहीही झाले नाही. – डॉ. भोये, वैद्यकीय अधिकारी, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र.

Back to top button