अकोला: दुस-या दिवशीही शुकशुकाटच, १०१ आरोपींना अटक; इंटरनेट सेवेसह बाजारपेठ बंद | पुढारी

अकोला: दुस-या दिवशीही शुकशुकाटच, १०१ आरोपींना अटक; इंटरनेट सेवेसह बाजारपेठ बंद

अकोला, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जयहिंद चौक, हरीहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री झालेल्या दंगलीनंतर शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी आतापर्यंत १०१ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद केली आहे. शिवाय शहरातील चार पोलीस स्टेशन्सच्या हद्दीत संचारबंदी व जमावबंदी असल्याने बाजारपेठही बंद होती. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. दरम्यान सोमवारी संध्याकाळी संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज (दि. 15) दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

मोबाईलवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे १३ मे रोजी शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन गटातील जमावाने दगडफेकीस सुरुवात केली. त्यामुळे जुने शहरातही तणाव निर्माण झाला. सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करून नुकसान करण्यास काहींनी सुरुवात केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात हरिहरपेठ भागातील विलास गायकवाड याचा दगडफेकीत मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दुस-या दिवशी १४ मे रोजी कलम १४४ चे आदेश दिले. त्यानंतर शहरातील चार पाेलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी व जमावबंदी लागू झाली. सोमवारी परिस्थिती नियंत्रणात येवू शकली. मात्र अफवांना थांबवण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. प्रशासनाने तातडीने शांतता समितीची बैठक घेवून नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

असा आहे जिल्हाधिका-यांचा आदेश

अकोला शहरातील सिटी कोतवाली व रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेले संचारबंदी निर्बंध हटविण्यात येऊन जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जुने शहर व डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करुन १५ मे पासून सायं. ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर १५ मे चे रात्री ८ ते १६ मे चे सकाळी ८ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १६ मेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ८ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी निमा यांनी म्हटले आहे.

१०१ आरोपींना अटक

दंगा करणे, बेकायदेशीर मंडळी जमा करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचा-यांवर हल्ला करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आदी कारणावरून घटनेनंतर पोलिसांनी १०१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली आहे. अजूनही पोलिसांची धरपकड सुरुच आहे.

Back to top button