बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वातावरणातील उष्णतेचा पारा 42 अंशापेक्षा जास्त जात आहे. उजनी धरणासह इतर छोटे-मोठे नदी, नाले, तलाव यातील पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे मुक्या जनावरांसह पशु, पक्षी, जनावरे यांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. अनेक पक्षी उष्माघाताने मृत पावल्याचे दिसत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे बहुतांश पानवठे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे बहुतांश पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र, दूषित पाणी आणि उष्माघाताचा परिणाम पशुपक्ष्यांवरतीही होत असून अनेकांचे यातून जीव गेल्याचेही समोर आले आहे. एरवी हजारोंच्या संख्येने उजनी धरणाच्या जलाशयावर दिसणारे पाणकोंबडी बदक, पांढरे कावळे यासारख्या पक्ष्यांची संख्याही वाढत्या उष्णतेमुळे अचानकपणे कमी झाली आहे. धरणातील पाणी कमी होत असल्याने दलदलीच्या जागा तसेच सखल भागातील भूभाग रिकामा झाल्याने पशुपक्ष्यांना मुबलक प्रमाणात कीटक, पाण वनस्पती, मासे उपलब्ध होत असतानाही पक्ष्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे.
वाढत्या उष्णतेचे चटके पशुपक्ष्यांप्रमाणे पाळीव जनावरांनाही सोसवेनासे झाले आहेत. चारा, पाण्यासाठी भटकंती करणार्या शेळ्या मेंढ्या व इतर जनावरांना उन्हाचा चटका बसत आहे. यामुळे मिळेल त्या झाडाखाली जनावरे सावलीचा आधार घेऊ लागली आहेत. राज्यात उष्माघात प्रवण जिल्ह्यांमध्ये अकोला, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, धुळे, नांदेड, जळगाव, हिंगोली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. सध्या पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. पाळीव व इतर पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. झाडे, इमारती, कॉलनी, गच्ची तसेच मोकळ्या जागी पक्ष्यांसाठी पाणी तसेच धान्य ठेवावे. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी उन्हाळा सुसह्य होईल. घराशेजारी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करावीत म्हणजे ऐन उन्हाळ्यात मुक्या प्राण्यांना आपला जीव वाचवण्यास मदत होईल.
सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये एकमेव उजनी धरणावर पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती व पशुपक्ष्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असल्यामुळे पशुपक्ष्यांची संख्या घटत आहे. आणखी महिनाभर उन्हाळा शिल्लक असून परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.