श्रीरामाच्या यौवराज्यभिषेकाशी संबंधित अशी सर्व कामे योग्य माणसांवर सोपवून व ती सर्व कामे मार्गाला लागल्याचे पाहून , राजा दशरथाची स्वारी कैकयीच्या वाड्याकडे मोठ्या खुशीत वळली. परंतु तिच्या महालात तो केस मोकळे साेडलेली, फाटकी वस्त्रे ल्यालेली आणि अंगावरची दागिने इतस्तत: फेकून जमिनीवर पडून राहिलेली कैकेयी त्याच्या दृष्टीस पडली. तो तिच्याजवळ जावून प्रेमळ शब्दात म्हणाले, 'लाडके उद्या आपल्या श्रीरामाला व्हावयाच्या यौवराज्यभिषेकानिमित्त सर्वत्र आनंदीआनंद असताना तू अशी दु:खी का? तुला काही हवं असल्यास ते मोकळेपणाने माझ्याकडे माग. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळेस मी माझे प्राणही पणाला लावीन.' यावर कैकेयीने विचारलं. 'मी मागेन ते दोन वर पूर्ण करावयाचे आहे. मला तुमच्या लाडक्या रामाची शपथ घेवून तुम्ही वचन देता का? राजा दशरथ म्हणाले – 'कैकेयी, रघुकुलाची थोर परंपरा तुला ठाऊक नाही वचनपूर्तीसाठी आम्ही वेळेस प्राण देऊ. पण वचनभंग करणार नाही. अशा स्थितीत आणखी श्रीरामाची शपथ घेण्याची काय गरज आहे. तरीही त्याची शपथ घेऊन तुला वचन देतो की, तू मागशील त्या दोन वरांची मी पूर्तता करीन.' कैकेयी बालू लागली. 'नाथ, मी काही कोणते नवे वर मागत नाही. शवर व इंद्र यांच्या सुरु झालेल्या युध्दात इंद्राला मदत करण्यासाठी तुम्ही गेला होता. त्यावेळी मीही तुमच्यासंगे आले होते. तेव्हा तुम्ही दैत्यांच्या बाणांनी मूर्च्छा येऊन पडला असताना तो रथ दैत्यांच्या कोंडाळ्यातून कौशल्याने बाहेर काढून तुमच्या शरीरात घुसलेले बाण हळुवारपणे काढून व तुम्हाला औषधोपचार करून मी तुमचे प्राण वाचवले. म्हणून तुम्ही जे दोन वर देऊ केले होते ते मी आता तुमच्याकडे मागत आहे.' राजा म्हणाले, 'माग, ना मी ते पूर्ण करायला तयार असाताना तू असा वेळ का लावतेस?' राजा शब्दात पक्का अडकल्याचे पाहून कैकेयी म्हणाली, 'एका वरानुसार श्रीरामाऐवजी माझ्या भरताला यौराज्यभिषेक करा आणि दुसस-या वराप्रमाणे श्रीरामाला तापसी वेषात उद्याच्या उद्या चौदा वर्षासाठी दंडकारण्यासारख्या दुरच्या वनात पाठवा.' कैकयीच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या दोन मागण्या ऐकून राजा दशरथावर जणू आकाश कोसळले. मूर्च्छा येऊन ते भूमीवर कोसळला. थोड्या वेळाने शुध्दीवर आल्यावर तो काकुळतीने तिला म्हणाले. 'कैकेयी अग, एक वेळ अन्नपाण्यावाचूनही मी दिवसानुदिवस तग धरीन पण माझ्या रामाशिवाय मी घटका दोन घटकाही काढू शकणार नाही. वाटल्यास मी रामाऐवजी भरताला यौवराज्यभिषेक करतो. पण माझ्या रामाला चौदा वर्षाच्या वनवासाला पाठवण्याचा हट्ट तू धरु नकाे. पण यावर कैकेयी एकच उत्तर देई. 'शब्द पाळणा-या रघुकुलाची थोर परंपरा सांगणारे तुम्ही आता दिलेले वचन मोडू पाहता. खुशाल मोडा पण हे लक्षात ठेवा की, जर का तुम्ही उद्या रामाला यौवराज्यभिषेक करु लागलात तर तिथे येवून तुम्ही वचन मोडल्याचा मी डांगोरा पिटीन आणि आत्महत्या करून घेईन.' कैकेयीची ती धमकी ऐकून राजा तिला म्हणाले, 'आजपासून माझ्या तुझ्यातले पतीपत्नीचे संबंध संपले आहेत.' राजा जेमतेम एवढेच बोलले व पुन्हा मुर्च्छीत होवून खाली पडले.