दहावी पेपर तपासणीसाठी 15 एप्रिलची ‘डेडलाईन’ | पुढारी

दहावी पेपर तपासणीसाठी 15 एप्रिलची ‘डेडलाईन’

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी 15 एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

तर पेपर तपासणी एकूण पाच टप्प्यात होणार असून, त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण विभागा तील अधिकार्‍यांनी दिली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान पार पडली. राज्यभरातील 15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. त्यांच्या पेपर तपासणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. पेपर तपासणीमध्ये शिक्षकांनी जुन्या पेन्शनसाठी केलेल्या संपामुळे व्यत्यय आला होता; परंतु संप मिटल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणी सुरू केली आहे.

राज्य मंडळाने पेपर तपासणीचे नियोजन ठरवून पेपर तपासणीसाठी वेळापत्रकच दिले आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जर पेपरतपासणी पार पडली तर यंदा देखील दरवर्षीप्रमाणेच वेळतच दहावीचा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहावी पेपर तपासणीचे असे आहेत टप्पे…

1) 2 ते 4 मार्चला झालेले पेपर – पहिला
2) 6 ते 10 मार्चला झालेले पेपर – दुसरा
3) 13 ते 15 मार्चला झालेले पेपर – तिसरा
4) 17 ते 20 मार्चला झालेले पेपर – चौथा
5) 23 ते 25 मार्चला झालेले पेपर – पाचवा

संपामध्ये शिक्षकांच्या सहभागाचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर आरंभीच्या काळात दिसत होता. परंतु संप मागे घेतल्यानंतर परीक्षकांनी पेपर तपासणीचे काम पूर्ण करून नियामकांकडे वेळेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दिलेल्या वेळापत्रकानुसार उत्तरपत्रिका जमा होण्यास योग्य तो प्रतिसाद मिळत आहे. वेळापत्रकाचे पालन केल्यास दहावी-बारावी निकाल वेळेवर जाहीर होण्यास अडचण येणार नाही.
– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

Back to top button