नगर : कांदा अनुदानाने मिळणार दिलासा | पुढारी

नगर : कांदा अनुदानाने मिळणार दिलासा

नगर; पुढारी वृत्तसेवा : सन 2022 – 2023 या वर्षात जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. 3 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत कांदा उत्पादकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजारमध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 350 रुपये व जास्तीत जास्त 200 क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा अनुदान योजना सन 2022 -2023 चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज हा कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

कागदपत्रे जोडणे बंधनकारक
विक्री केलेल्या कांदा विक्रीची मूळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात सातबारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र आवश्यक आहे. सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकर्‍यांनी कांदा विक्री केला त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक , नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पुरी यांनी कळविले आहे.

Back to top button