नाशिक : फोटो व्हायरलच्या धमकीमुळेच आत्महत्या | पुढारी

नाशिक : फोटो व्हायरलच्या धमकीमुळेच आत्महत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील आडगाव परिसरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या 22 वर्षीय विद्यार्थिनीने तीन आठवड्यांपूर्वी केलेल्या आत्महत्येचे गूढ उकलले असून, तिच्या मित्राने बरोबर काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची दिलेली धमकी त्यासाठी कारणीभूत असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. यानुसार आडगाव पोलिसांनी सांगलीच्या संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, निफाड तालुक्यातील रहिवासी असलेल्या मुलीने 20 दिवसांपूर्वी आडगाव शिवारातील म्हाडा इमारतीमधील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे कारण न समजल्याने अजूनही त्याबाबत तपास सुरूच होता. मात्र, मृत मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात तिच्या सहविद्यार्थ्यावर संशय व्यक्त केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, सांगोला येथील अजित लाळगे असे संशयित युवकाचे नाव आहे. संशयित अजित हा दारू पिऊन तिचे फोटो व व्हिडिओ काढत असे. नंतर तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत होता. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून संशयित युवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button