राष्ट्रवादी-भाजपात रंगणार लढत! बाजार समिती निवडणुकीसाठी पाथर्डी तालुक्यात राजकीय वारे | पुढारी

राष्ट्रवादी-भाजपात रंगणार लढत! बाजार समिती निवडणुकीसाठी पाथर्डी तालुक्यात राजकीय वारे

अमोल कांकरिया

पाथर्डी तालुका : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजल्याने, तालुक्यात जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी व सहकारी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी, अशी लढत मागील निवडणुकीत झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समिती निवडणुकीत बाजी मारली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ सत्तेवर आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. माजी आमदार चंद्रशेखर घुले, अ‍ॅड. प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांनी भाजपचे तत्कालीन नेते स्व.राजीव राजळे व आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधकांची एकत्र मोट बांधत, पाथर्डी बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला होता.

नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन, आमदार मोनिका राजळे यांच्यावर सडकून टीका करत, पाथर्डी बाजार समिती व अन्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी पाथर्डी व शेवगाव या दोन्ही तालुक्यात संवाद यात्रेतून जनतेशी संपर्क साधला. या निवडणुकीत तो राष्ट्रवादीला फायद्याचा ठरणार आहे की नाही, हे निकालानंतरच पाहायला मिळेल. असे असले तरी आमदार मोनिका राजळे यांच्या विकासकामांचा धडाका व मतदारसंघात असलेला संपर्क व संवाद, यामुळे निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीत जोरदार लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सध्या महाविकास आघाडीची ताकद मिळत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पक्ष, असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपला राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांच्याशी लढत करावी लागणार आहे. शिवाय इतरांची तिसरी आघाडी होणार का? हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून, शेतकरी राजा व मतदार बाजार समितीचा कौल कोणाला देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार
व्यापारी व बाजार समितीत झालेला संघर्ष, समितीच्या जागेवर झालेली अतिक्रमणे, तूर खरेदी-भूखंड वाटपातील घोटाळा, नियम डावलून गाळ्यांचा लिलाव, समितीची बांधण्यात येणारी व्यावसायिक इमारत आदींसह इतर मुद्द्यांवरून प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकात आरोपांच्या फैरी झडणार आहेत.

प्रशासक राज येणार संपुष्टात
जिल्ह्यातील चौदा बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. सध्या प्रशासक कामकाज पाहत आहे. त्यात पाथर्डी बाजार समितीचाही समावेश आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत तालुक्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Back to top button