चिखली जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनास विलंब | पुढारी

चिखली जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनास विलंब

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिखली जलशुद्धीकरण केंद्राची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ती काामे आटोपली की, तात्काळ केंद्राचे उद्घाटन करून शहराला 100 एमएलडी पाणीपुरवठा केली जाईल, असा नवा दावा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला आहे. आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीवरील निघोजे बधार्‍यावरून दररोज 100 एमएलडी पाणी महापालिका उचलत आहे.

त्यासाठीची पाणीपुरवठा विभागाच्या सर्व यंत्रणेची तयारी ऑक्टोबर 2022 ला पूर्ण झाली आहे. असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकार्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, उद्घाटनासाठी राज्याचा नेता उपलब्ध होत नसल्याने मार्च महिना उजाडला तरी, 100 एमएलडी पाणी अडून पडले आहे.

उन्हाळा वाढल्याने शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पालिकेचे नेत्र रुग्णालय व कचरा ट्रॉन्सफर सेंटरचे उद्घाटन रविवारी (दि.19) मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांच्या हस्ते शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन का करण्यात आले नाही, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. शहरात पाण्याची ओरड असताना अतिरिक्त 100 एमएलडी पाणीबाबत पालिका प्रशासन जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याबद्दल शहरभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अर्थसंकल्प सादर करताना त्यासंदर्भात आयुक्त सिंह म्हणाले होते की, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्धीकरण यंत्रणा, शहरातील जलवाहिन्या जोडणे, व्हॉल्व्ह, पाणीपुरवठा व्यवस्थापन आदींची चाचणी पूर्ण झाली आहे. मार्चअखेरीस पाणीपुरवठा सुरू होईल. आता तेथील कामे अपूर्ण असल्याचा नवा दावा आयुक्त करीत आहेत. कामे झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चुकीचे सांगत असल्याचे ही ते म्हणाले. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच पाणी दिले जाईल, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. केंद्राच्या उद्घाटनासाठी नेते उपलब्ध होत नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Back to top button