

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, गडहिंग्लज व जयसिंगपूर या तीन शेती उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीसाठी विकास संस्था व ग्रामपंचायत गटातील अंतिम मतदार याद्या सोमवारी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी जाहीर केल्या. यामुळे येत्या पंधरा दिवसांत या तिन्ही बाजार समितींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या तिन्ही बाजार समितींच्या मतदार यादींचा अंतिम कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला होता. मात्र, विकास सेवा सोसायट्या आणि ग्रामपंचायत अनेक निवडणुका झाल्या. या सदस्यांना मतांचा अधिकार मिळावा, यासाठी राज्यभरातून याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर या दोन्ही गटांतील सुधारित मतदार याद्या तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील या तिन्ही बाजार समितींच्या सुधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या. जिल्हा उपनिबंधकांनी या याद्या सादर करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. या हरकतींवर निकाल देऊन आज अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
बाजार समितींच्या मतदार संघनिहाय संख्या
कोल्हापूर विकास संस्था 14131, ग्रा.पं. 5733, अडते 1217, हमाल 894
गडहिंग्जल विकास संस्था 4895, ग्रा.पं. 2729, अडते 697, हमाल 147
जयसिंगपूर विकास संस्था 1910, ग्रा.पं. 668, अडते 356, हमाल 87