महाविकास आघाडीला बंडखोरीची भीती | पुढारी

महाविकास आघाडीला बंडखोरीची भीती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालानंतर महाविकास आघाडीला बंडखोरीची भीती वाटत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

शिंदे – फडणवीस सरकार पुढील आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याबाबतीत विरोधी पक्षांची भूमिका कशी असावी, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती.

शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाना पटोले, रामराजे नाईक – निंबाळकर, अबू आझमी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला आघाडीचे आमदार आणि खासदारही हजर होते.
अर्थसंकल्पावर सत्ताधारी पक्षांना कसे भिडायचे, याबाबत या बैठकीत प्रमुख नेते मार्गदर्शन करतील, अशी शक्यता होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांतर राज्यात नेमकी कशी परिस्थिती असू शकते, यावरच नेत्यांनी विविध शक्यता व्यक्त केल्या. त्यामध्ये विरोधकांमध्ये बंडखोरी होऊ शकते, अशी भीती व्यक्त केल्याची माहिती एका ज्येष्ठ आमदाराने दिली.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील विजय आणि पराभवावरही या बैठकीत मंथन झाले . एकत्र लढल्यावर काय होते हे कसबामध्ये आपल्याला दिसले. तर बंडखोरी झाली की काय निकाल लागतो ते चिंचवडच्या निकालाने दाखवल्याचे अनेकांनी मान्य केले. तसेच विशिष्ट वर्ग आपल्या बाजूने आहे, असे समजणार्‍या भाजपाला कसबा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून, लोकांनी आम्हाला गृहीत धरू नका असे दाखवून दिले आहे. यावरून महाविकास आघाडीवर लोकांचे प्रेम असल्याचे आज सिद्ध झाले, असा दिलासाही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

राउतांच्या विधानावर नाराजी

महाविकास आघाडीच्या या डिनर डिप्लोमसीमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चर्चा झाली. राजकीय मैत्री असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून राऊतांच्या विधानावर काहीअंशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

Back to top button