पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळला | पुढारी

पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळला

पैठण पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यामध्ये गुरुवारी दि. २ मार्च रोजी सकाळी मृतदेह आढळून आला आहे. सदरील मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील उमेश राजू राऊत (वय २८) या तरुणाचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत माहिती अशी की येथील नाथसागर धरणाच्या साखळी क्रमांक १७८ परिसरातील पाण्यामध्ये गुरुवारी रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीचे मृतदेह तरंगत आहे. अशी माहिती धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे यांना दिली. तत्काळ पो ना सुधीर ओव्हळ, लक्ष्मण पुरी, समाधान भागीले, सतीश भोसले, संतोष खिळे यांच्या पथकाला घटनास्थळ पाठविण्यात आले.

पोलीस पथकाने सदरील मृतदेहाची पाहणी करून नागरिकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

मृत व्यक्तीच्या खिशामध्ये नाव पत्ता आढळून आला. त्या व्यक्तीचे नाव उमेश राजू राऊत (रा. कळंकी, ता. कन्नड ह मु हिवाळे लॉन्स जवळ, बीड बायपास) अशी माहिती प्राप्त झाल्याने पैठण पोलिसांनी संबंधित मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक पैठणकडे निघाले असून या व्यक्तीने आत्महत्या का केली याबाबत पैठण पोलीस तपास करीत आहे.

Back to top button