अकोले : संकेत नवलेचे मारेकरी मोकाट; खून होऊन दोन महिने उलटले | पुढारी

अकोले : संकेत नवलेचे मारेकरी मोकाट; खून होऊन दोन महिने उलटले

अकोले; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नवलेवाडीचा सुपुत्र संकेत सुरेश नवले या महाविद्यालयीन तरुणाची हत्या डिसेंबर महिन्यात झाली होती. संकेतच्या हत्येला दोन महिने उलटूनही त्याच्या मारेकर्‍यांपर्यंत अद्याप पोलिस पोहचू शकलेले नाहीत. अकोल्यातील नवलेवाडीचा संकेत सुरेश नवले हा संगमनेर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या 22 वर्षीय तरुणाचा दि. 8 डिसेंबर गुरुवारी रात्री संगमनेर शहरातील सुकेवाडी परिसरात खून झाला होता. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती.

या घटनेनंतर नवलेवाडी ग्रामस्थांनी बैठक घेऊन पोलिसांना सहकार्य करून दशक्रिया विधी होईपर्यंत पोलिस तपासाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु संकेतचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर पोलिस यंत्रणेच्या भूमिकेविरोधात नवलेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष ग्रामसभा घेऊन मशाल मोर्चाचे आयोजन केले होते.

दि. 22 डिसेंबर गुरुवारी सायंकाळी मशाल मोर्चा नवलेवाडीतील हुतात्मा स्मारकापासून पोलिस ठाण्यावर नेण्यात आला होता. संकेतच्या मारेकर्‍याचा शोध लागला पाहिजे, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, कॉ. डॉ. अजित नवले, शिवसेनेचे महेश नवले, रिपब्लिकन पक्षाचे उपध्याक्ष विजय वाकचौरे, शेतकरी पुत्र सुरेश नवले, विठ्ठलराव चासकर, शंभु नेहे,विक्रम नवले, नवलेवाडीचे संरपच विकास नवले, काँग्रेसच्या जिजी नवले, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा स्वाती शेणकर या सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तहसीलदार सतिष थेटे, स. पो. नि.मिथुन घुगे यांना देण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी संकेत नवलेच्या मारेकर्‍यांचा लवकर शोध लावुन संकेतला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.

यानंतर संकेतचे आई- वडील, नातेवाईक, ग्रामस्थांनी संगमनेर, अकोले पोलिस यंत्रणेची अनेकदा भेट घेऊन तपासातही मदत करुन आमच्या संकेतला न्याय द्या, अशी हार्त हाक देऊनही या घटनेला दि. 8 फेब्रुवारीला दोन महिने पूर्ण होतील. तरी देखील संकेत नवलेचा मारेकरी पोलिसांना अद्यापही सापडला नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

संकेत हा संगमनेरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याचे कोणाशीही वैर नव्हते. त्यामुळे त्याचा खून कोणी केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी संकेत याच्या मित्रांकडे चौकशी केली. परंतु या तपासातून त्यांना कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेलेले आहेत. संकेत याच्या खूनाचा तपास कोणत्या दिशेने सुरू करावा? असे त्यांच्या समोर प्रश्न चिन्ह आहे.

दरम्यान मयत संकेत याच्या नातेवाईकांनी आरोपींचा तपास लावावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्याच्या पायर्‍या झिजवित आहेत. परंतु पोलिसांकडून त्यांना केवळ अश्वासनांची खैरात मिळत आहे. नगर येथील गुन्हे अन्वेषण शाखेचे उत्कृष्ट कार्य आहे. परंतु त्यांनाही या खुनाचे अद्यापि काहीही धागेदारे हाती लागलेले दिसत नाहीत.

संकेत नवलेची हत्या होऊन दोन महिने होत आहे. अद्यापि पोलिसांना त्याचे मारेकरी सापडले नसून ते मोकाट फिरत आहे. हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांनी त्या मारेकर्‍यांचा शोध घेणे गरजेचे असून तपास या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. संकेतचे मारेकरी गजाआड होऊन न्याय मिळावा, म्हणून पुन्हा नवलेवाडीत ग्रामसभा घेऊन आंदोलनाची नवीन दिशा ठरविणार आहे.

\                                   – महेशराव नवले, सामाजिक कार्यकर्ते, नवलेवाडी.

Back to top button