

कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi Wedding) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कन्या अंशासोबत लग्नबंधनात अडकला आहे. दोघांचा निकाह कराची येथे धुमधडाक्यात पार पडला. त्यामुळे शाहिन आता शाहिद आफ्रिदीचा जावई झाला आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
या
सोहळ्याला पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद, सध्याचा कर्णधार बाबर आझम, शादाब खान यांसारख्या स्टार क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. शाहीन आणि अंशाचा साखरपुडा दोन वर्षाआधीच झाला होता. तथापि, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा विवाह सोहळा लांबला. अंशा आणि शाहिनचे पाहुण्यासोबतचे लग्न समारंभातील फोटो व्हायरल झाले आहेत. लग्नात शाहिन आणि अंशा पारंपरिक पोशाखामध्ये दिसले.
शाहिद आफ्रिदीने 2021 मध्ये शाहिन आणि त्याची मुलगी अंशा यांच्या लग्नाची खुशखबर दिली होती. मात्र, आफ्रिदीची इच्छा होती की, त्याच्या मुलीने आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे. शाहीनने अंशासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, टी-20 विश्वचषकानंतर शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
जानेवारीत चार क्रिकेटपटूंचा विवाह (Shaheen Afridi Wedding)
पाकिस्तानचे क्रिकेटपटू शादाब खान आणि शान मसूद यांनी जानेवारीमध्ये लग्न केले होते. त्याचवेळी भारतीय संघाचे खेळाडू के.एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनीही याच महिन्यात विवाह केला. यातील राहुलच्या विवाहाची चर्चा अजूनही सुरू आहे. अभिनेता सुनील शेट्टीची कन्या अथिया हिच्याशी राहुलने लग्नगाठ बांधली. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने गतवर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते.