औरंगाबाद : सायबर भामट्यांकडून पोलिसांनी ११ लाख मिळविले परत | पुढारी

औरंगाबाद : सायबर भामट्यांकडून पोलिसांनी ११ लाख मिळविले परत

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जानेवारी महिन्यात सायबर भामट्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून अनेकांना लुटले. त्यांतील ११ जणांचे दहा लाख ८० हजार रुपये सायबर पोलिसांनी प्रयत्न करून परत मिळविले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

नववर्ष, मकरसंक्रांत, २६ जानेवारी निमित्ताने ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी खरेदीवर आकर्षक सूट व बक्षिसे, तसेच क्रेडिट कार्डवर कॅशबॅकच्या ऑफर जाहीर केल्या. त्यानिमित्ताने अनेकजण ऑनलाइन खरेदीकडे वळतात. त्याचा फायदा घेऊन सायबर भामटे नागरिकांना गंडा घालतात. असे अनेक तक्रारदार सायबर पोलिसांकडे धाव घेतात. पोलिस तांत्रिक माहिती घेऊन फसवणूक झालेली रक्कम कुठे गेली, कोणत्या खात्यात वळती झाली याची माहिती घेतात. शक्य असेल तर संबंधितांना तत्काळ पत्रव्यवहार करून हे पैसे रोखून ठेवतात. ते परत मिळविण्याची कायदेशीर प्रक्रिया करतात.

जानेवारी महिन्यात फसवणूक झालेल्या एकूण तक्रारदारांपैकी अकरा तक्रारदात्यांच्या क्रेडिट कार्डची व बँकेची संपूर्ण माहिती घेऊन सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांच्यासह सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, सविता तांबे, अंमलदार जयश्री फुके, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, शाम गायकवाड, राम काकडे, अभिलाष चौधरी यांनी परिश्रम घेत, या तक्रारदात्यांचे दहा लाख ८० हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.

Back to top button