शिक्षकाचे आत्मचिंतन : विचार न करता ओरडलो, चुकले, सॉरी मुलांनो! | पुढारी

शिक्षकाचे आत्मचिंतन : विचार न करता ओरडलो, चुकले, सॉरी मुलांनो!

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा:  गुणवत्ता वाढीसाठी अध्ययनस्तर सुधारावा म्हणून सुरू केलेल्या विविध उपक्रमांचा मनावर ताण आला, वाढलेल्या ताणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा विचार न करता त्यांच्यावर ओरडलो, सॉरी मुलांनो, माझे चुकलेच, अशा शब्दात एका शिक्षकाने आत्मचिंतन पेटीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविलेल्या आत्मचिंतन पेटीचा फायदा केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनादेखील त्यांच्याकडून झालेल्या चुका सुधारण्यासाठी होत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
चूक नसतानाही एखाद्या व्यक्तीला विनाकारण रागावले जाते. हा प्रकार लक्षात आल्यावर पश्चाताप होतो. अशा वेळी काय करावे हे सूचत नाही. स्वतः माफी मागावी असे ठरवले तर ते काही वेळा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेत आत्मचिंतन करून चूक सुधारण्यासाठी सर्व शिक्षण अभियानांतर्गत आता शाळांमध्ये आत्मचिंतन पेटी बसवण्यात आली आहे. या आत्मचिंतन पेटीचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही होत आहे.

आत्मचिंतन पेटी उघडली असता त्यात सरांना खेळायला दिलेली बॅट माझ्याकडून पडली व खराब झाली ही बाब मी सरांना सांगितली नाही सॉरी सर, पिण्याचे पाणी माझ्याकडून मैत्रिणीच्या बॅगवर सांडल्याने आमच्या दोघींची भांडण झाले, ते मी मॅडमला सांगितले नाही सॉरी मॅडम, माझ्याकडून मॅडमची वही हरवली, मी ते मॅडमला सांगितले नाही दुसऱ्या दिवशी नवीन वही आणली, सॉरी मॅडम अशा अनेक चुका विद्यार्थ्यांकडून आत्मचिंतन पेटीच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्या. साने गुरुजी जयंतीचा कार्यक्रम पूर्वनियोजित नसल्याने ऐनवेळी फजिती झाली, नियोजन केले असते तर असे झाले नसते सॉरी, अशी कबुली एका शिक्षकाने दिली आहे.

आत्मचिंतनाने दोष शोधणे शक्य

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा, राष्ट्रभक्ती, स्त्री-पुरुष समानता, संवेद- नशीलता या दहा मूल्यांची जोपासना होते. त्याचबरोबर अहंमपणा न ठेवता रागावर नियंत्रण मिळवण्यासह स्वतः मधील दोष शोधणे आवश्यक आहे. ते आत्मचिंतनाने शक्य होते. या पार्श्वभूमीवर आता शाळांमध्ये आत्मचिंतन पेट्या बसविण्यात आल्या आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी या आत्मचिंतन पेटीत त्यांच्या हातून झालेली चूक कागदावर लिहून पेटीत टाकावी. या उपक्रमाच्या मागे शिक्षा करणे हा नव्हे तर चूक मान्य करत विद्यार्थ्यांना आत्मचिंतनाची सवय लावणे हा उद्देश आहे. प्रत्येक शाळेत ही पेटी दर शनिवारी उघडण्यात येते, असे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Back to top button