औरंगाबाद : पाठपुरावा केला, परंतु कुणी दखल घेईना; अखेर गावकऱ्यांनीच उभारली शाळेची इमारत | पुढारी

औरंगाबाद : पाठपुरावा केला, परंतु कुणी दखल घेईना; अखेर गावकऱ्यांनीच उभारली शाळेची इमारत

वाळूज; बबन गायकवाड :  वाळूजजवळील गुरुधानोरा या गावातील जिल्हा परिषदेची शाळा वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे दोन सत्रांत चालायची. त्यातही काही वर्गांत तर काही मुले बाहेर बसून शिक्षण घ्यायची. शाळेच्या वर्गखोल्या बांधण्याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली, पाठपुरावा केला; परंतु कुणी दखल घेईना. अखेर गावकऱ्यांनीच ठरवलं. मग काय, म्हणतात ना… ‘जे न राव करी, ते गाव करी’. गावकऱ्यांनी लोकवर्गणी केली आणि त्यातून आता दोनमजली अलिशान अशी जिल्हा परिषद शाळेसाठी टुमदार इमारत उभी केली. गुरुधानोरकरांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गांगापुर तालुक्यातील गुरुधानोरा या गावाची लोकसंख्या अवघी ३ हजार आहे. येथे जि. प. प्राथमिक शाळा आहे. इयत्ता आठवीपर्यंत शाळेचे वर्ग भरतात. विद्यार्थिसंख्याही मोठी आहे. केवळ इमारतीअभावी शाळेचे वर्ग दोन सत्रांत भरविले जायचे. त्यात व्हरंड्यात, तर कधी मोकळ्या जागेत बसून विद्यार्थ्यांना अ, आ, ई, ईचे पाढे गिरवावे लागत होते.

शाळेसाठी वर्गखोल्या मिळाव्यात, यासाठी अनेक वेळा शासनाचे उबरठे झिजविले, मात्र प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ग्रामस्थांनीच एकजूट करीत लोकवर्गणीतून दोनमजली इमारत बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. पाहता पाहता काही दिवसांतच गावकऱ्यांनी तब्बल ५ लाख ८६ हजारांचा निधी जमा केला. हा निधी ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीसाठी दिला. त्यामधून शाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता आता दोनमजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या शाळेचे लोकार्पण करून ही इमारत मुलांना शिक्षणासाठी खुली करण्यात येणार आहे.

लोकसहभागातून गावात अनेक कामे

गुरूधानोरा, मुर्शिदाबाद, सुलतानपूर ही तीन गावे मिळून येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामस्थाच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यासाठी सर्वांच्या एकजुटीतून गाव समितीची स्थापना करण्यात आली. गावात उल्लेखनीय कामकाजात प्रामुख्याने भूमिगत गटार बांधकाम, सिमेंट रस्ते, सार्वजनिक स्मशानभूमी, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉक, हायमास्ट टॉवर दिवे, अंतर्गत रस्ते, जलसंधारणा अंतर्गत गावातील पाझर तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले. परिणामी गावातील बागायती क्षेत्रही वाढले आहे. जानकीदेवी बजाज फाउंडेशनचे गावाला चांगले सहकार्य लाभल्याचे अनेकजण सांगतात.

Back to top button