नगर कॉलेजमध्ये राडा ! शिवजयंती साजरी करण्यास विरोध; पोलिस आरोपींच्या मागावर | पुढारी

नगर कॉलेजमध्ये राडा ! शिवजयंती साजरी करण्यास विरोध; पोलिस आरोपींच्या मागावर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिवजयंती कॉलेजमध्ये साजरी करण्यासाठी प्राचार्यांना पत्र देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करायची नाही, असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. नगर कॉलेजमध्ये गुरूवारी (दि.19) साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने जमाव पळून गेला. करण संदीप पाटील (रा. लकारगल्ली, भिंगार) या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरून 20 ते 30 तरूणांच्या टोळक्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कॉलेजमध्ये साजरी करण्याबाबत प्राचार्यांची परवानगी घेण्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले. त्यानुसार करण पाटील व वर्गमित्र दीपक बाबासाहेब वाघ, अभिषेक सुधाकर मुळे, अक्षय सुखदेव जमादार, केविन त्रिभुवन व इतर विद्यार्थी प्राचार्यांना परवानगीचे पत्र देण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी 20 ते 30 तरुण त्यांच्याजवळ आले व इथे गर्दी का करता, आम्ही कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करु देणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले.  कॉलेजमध्ये मारामारी होत असल्याचे लक्षात येताच शिक्षक व पोलिस आल्याने जमाव पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

पोलिसांची तत्काळ  घटनास्थळी धाव

नगर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, संदीप थोरात आदींच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाविद्यालय प्रशासनाची बघ्याची भूमिका

नगर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना टोळक्याकडून मारहाण झाल्यानंतर कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार घडल्यानंतर विद्यार्थ्यांनाच पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जावे लागले. कॉलेज प्रशासनाची भूमिका मात्र बघ्याचीच असल्याचे दिसून आले.

फोटो-व्हिडिओ पोलिसांच्या हाती

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. घटनेचे काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याने त्या आधारे तपास करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

कॉलेजच्या गेटवर  मुलीला मारहाण

नगर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर काही वेळाने कॉलेजच्या गेटवर एक मुलगी एका मुलासोबत बोलत असताना तरूणांच्या टोळक्याने तेथे येऊन त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात मुलगी किरकोळ जखमी झाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Back to top button