पुणे : जुलाबाच्या त्रासात चिमुकल्यांना आधार जलसंजीवनीचा ! | पुढारी

पुणे : जुलाबाच्या त्रासात चिमुकल्यांना आधार जलसंजीवनीचा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिवाळ्यात रोटा विषाणूच्या संसर्गामुळे लहान मुलांमध्ये जुलाबांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. हवामानात बदल झाल्यावर मुलांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो आणि जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू होतो. मुलांना आराम मिळण्यासाठी जलसंजीवनी उपयुक्त ठरत असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सततच्या जुलाबांच्या त्रासाने मुले हैराण होतात आणि पालकांनाही काय करावे, हे सुचत नाही. अशा वेळी ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड आणि सायट्रेट यांचे मिश्रण असलेली पावडर 1 लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण पाजले जाते. विषाणूजन्य जुलाबात प्रतिजैविकांची गरज नसते, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) टाळणे महत्त्वाचे असते. जुलाब थांबवण्यासाठी आतड्यांची हालचाल कमी करणारी औषधे मुलांमध्ये धोकादायक ठरू शकतात.

लहान मुलांना विषाणूजन्य जुलाबांच्या त्रासामध्ये सुरुवातीला उलट्या होतात, ताप येतो आणि 24 तासांत पाण्यासारखे जुलाब सुरू होतात. प्रमाणाबाहेर जुलाब झाल्यास बाळाचे वजन घटते. सौम्य प्रकारात तहान वाढते आणि आजाराची तीव्रता जशी वाढते, तशी टाळू खोल पडते, जीभ कोरडी पडते, त्वचा सुरकुतते, लघवीचे प्रमाण कमी होते आणि मूल सुस्तावते. आजाराच्या तीव्रतेनुसार जलसंजीवनी दिली जाते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी दिली.

आहारातील बदल, हवामातील बदल, संसर्ग अशा विविध कारणांमुळे लहान मुलांना जुलाबाचा त्रास होऊ शकतो. बालकांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते. अशा वेळी मुलांना द्रवपदार्थ देत राहणे, संसर्ग टाळण्यासाठी शरीराची स्वच्छता राखणे आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे देणे आवश्यक असते. – डॉ. अतुल महाजन,
बालरोगतज्ज्ञ.

 

सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या जुलाबात पहिल्या चार तासांत वजनाच्या दर किलोमागे 50 ते 100 मिली जलसंजीवनी मिश्रण पाजावे. बाजारात मिळणार्‍या वेगवेगळ्या पाकिटांमध्ये घटकांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे निरीक्षण आहे. पाकीट विकत घेऊन मिश्रण तयार करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेल्या प्रमाणानुसारच घटक आहेत किंवा नाहीत हे पडताळून पाहावे.
                                                            – डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ

Back to top button