उत्तरेकडून थंडीची लाट; औरंगाबाद शहरात हुडहूडी, पारा ५.४ अंशावर | पुढारी

उत्तरेकडून थंडीची लाट; औरंगाबाद शहरात हुडहूडी, पारा ५.४ अंशावर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : उत्तरेकडून सुरू असलेल्या थंडीच्या लाटेचा सोमवारी (दि. ९) शहराच्या तापमानावर मोठा परिणाम झाला. एकाच दिवसात किमान तापमान ९.४ हून ५.४ अंशावर पोहचले असून तब्बल ४ अंशाने पारा घसरला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत हुडहुडी जानवली. पुढील तीन दिवस तापमानात कमीअधिक प्रमाणात घट सुरूच राहील, असे चिकलठाणा वेध शाळेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

शहराच्या तापमानावर मागील चार दिवसांपासून उत्तरेकडील थंडीचा परिणाम जाणवत आहे. शनिवारी किमान तापमान १२.४ अंशावर होते. ते रविवारी थेट ३ अंशाने घटून ९.४ अंशावर पोहचले. अन् सोमवारी त्यात पुन्हा ४ अंशाची घट होऊन पारा तब्बल ५.४ अंशावर पोहचला होता. अचानक तापमान कमी झाल्याने रविवारी रात्रीपासूनच शहरात सर्वत्र हुडहूडी पसरली होती. अनेक भागात रात्री उशीरापर्यंत शेकोट्या पेटल्याचे दिसून आले. दरम्यान सोमवारी दिवसभर गारवा कायम होता. थंडीची ही लाट पुढील चार दिवस कायम राहणार आहे.

नाशिकपेक्षाही कमी तापमान 

नेहमीच नाशिक शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद होत असते. परंतु सोमवारी नाशिक शहराचे किमान तापमान ८.७ अंश एवढे होते. तर औरंगाबाद शहराचे त्याहून कमी म्हणजेच ५.४ अंश राहिले. विशेष म्हणजे औरंगाबादपेक्षाही जळगावचे तापमान सर्वात कमी म्हणजेच ५ अंश एवढे होते.

मोसमातील कमी तापमान 

शहरात यंदाच्या मोसमात १० डिसेंबर रोजी सर्वात कमी म्हणजेच ७.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. परंतु सोमवारी त्याहून कमी म्हणजेच ५.४ अंशाची नोंद झाल्याने हे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे.

-हेही वाचा 

Severe cold wave in Maharashtra | महाराष्ट्र गारठला! राज्यात ४८ तासांत तीव्र थंडीची लाट; हवामान विभागाचा अंदाज

Weather update : थंडीची लाट! उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानाचा पारा घसरणार

सातारा : जिल्ह्यात थंडीचा कडाका; दिवसभर हुडहुडी

Back to top button