

हरारे, वृत्तसंस्था : झांबिया-झिम्बाब्वे सीमेवरील 350 फूट उंच व्हिक्टोरिया धबधब्याच्या माथ्यावर पाण्यात झोपलेल्या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अतिशय वेगाने कोसळणार्या पाण्यावर ही तरुणी झोपलेली आहे. हा व्हिडीओ पाहूनच मनाचा थरकाप उडत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ सुमारे दोन कोटी लोकांनी पाहिला आहे.
स्थानिक गाईड पाय धरून ठेवतात, ज्यामुळे जीव वाचतो
धबधब्याच्या माथ्यावर 'डेव्हिल्स पूल' नावाचा उथळ स्वरूपाचा नैसर्गिक बनलेला छोटा तलाव आहे. साहसी पर्यटनासाठी लोक या ठिकाणी येतात. ते तलावात उड्या मारतात. धबधब्याच्या टोकापर्यंत जातात आणि वाहत्या पाण्यावर झोपतात. यादरम्यान, लोक पाण्याच्या प्रवाहाने खाली पडू नयेत, म्हणून स्थानिक गाईड त्या पर्यटकांचे पाय धरून उभे राहतात.
लोक फक्त कंबरेच्या वरच्या भागाचा या माथ्यावर बसून व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे लोकांना असे वाटते की, ती व्यक्ती कोणत्याही आधाराविना अतिशय वेगात असलेल्या पाण्यात झोपलेली आहे. या धबधब्याच्या उतारावर जाण्याची परवानगी जून ते डिसेंबरदरम्यानच मिळते. कारण, तेव्हा पाण्याचा प्रवाह मंद असतो.