नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकतर्फी सभागृह चालवत आहेत, असा आरोप करत महाविकास आघाडीने नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. विधिमंडळ सचिवांकडे तसे पत्रही देण्यात आले आहे. मात्र या पत्रावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नाही.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांकडून अध्यक्षांवर एकतर्फी कामकाज चालवले जात असल्याचा आरोप होत आहे. विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी नाकारून विधानसभा अध्यक्ष हे सत्ताधारी आमदारांनाच बोलण्याची संधी देत आहेत, असाही आरोप महाविकास आघाडीने पत्रात केला आहे.
दिशा सालियन प्रकरणात अध्यक्ष नार्वेकर यांनी भाजप – शिंदे गटाच्या अकरा सदस्यांना बोलू दिले. पण विरोधी पक्षनेते अजित पवार वगळता अन्य एकाही विरोधी सदस्याला बोलू दिले नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला होता. या गोंधळात अध्यक्षांना अपशब्द वापरले म्हणून राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे अध्यक्ष विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करीत हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला गेला आहे.