विश्वासघातकी चीनचे खच्चीकरण गरजेचे!

विश्वासघातकी चीनचे खच्चीकरण गरजेचे!
Published on
Updated on

विश्वासघातकी चीनचे खच्चीकरण गरजेचे!
साम-दाम-दंड आणि भेद अशा सर्व मार्गांनी चीन आपल्या शेजारी देशांची कुरापत काढत आहे. अर्थात, भारताचाही त्याला अपवाद नाही.. अडीच वर्षांपूर्वी म्हणजे जून २०२० मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात घुसखोरी करू पाहत असलेल्या चीनला आपल्या सैनिकांनी जशास तसे उत्तर देत पिटाळून लावले होते. त्यावेळी २० सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती.

२०१७ मध्ये देखील चीनने डोकलाममध्ये दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता. दहा दिवसांपूर्वी विस्तारवादी चीनने अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय चौकी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैनिकांनी संख्येने मोठ्या आलेल्या चिन्यांना आल्या पावली परत जाण्यास भाग पाडले. चीनच्या विश्वासघातकीपणाचा इतिहास लक्षात घेतला तर भारताला अधिक मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडत चाललेल्या चीनचे खच्चीकरण करण्यासाठी भारताला गंभीर प्रयत्न करावे लागणार आहेत.

१९६२ च्या युद्धावेळी चीनने भारताचा मोठा भूभाग गिळंकृत केला होता. त्यानंतर वारंवार वाद उकरून काढत हळूहळू पुढे सरकण्याचे चीनचे धोरण राहिले आहे. गेल्या काही दशकांतील भारताच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा पुरेपूर फायदा उठवत चीनने शिरजोर होण्याचा प्रयत्न केला. तथापि, गलवानच्या संघर्षानंतर सावध झालेल्या मोदी सरकारने चीनला ठोशास ठोसा देण्याची नीती अवलंबली आहे. लष्कराचे आधुनिकीकरण केले जात आहेच; पण साडेतीन हजार किलोमीटर लांबीच्या चीनसोबतच्या सीमेवर पायाभूत सुविधांचा व्यापक प्रमाणात विकास केला जात आहे. संवेदनशील ठिकाणी सैनिकांची संख्या अरुणाचल प्रदेशपर्यंतची सर्व सीमा वादग्रस्त ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच सदैव दक्ष राहावे लागणार आहे.

गलवानच्या संघर्षानंतर दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या अनेक फेच्या पार पडल्या; पण तरीही चीनचा हेकेखोरपणा थांबलेला नाही. सरकारी आकडेवारीनुसार २०१९ मध्ये चीनने सहाशेवेळा सीमारेषेचे उल्लंघन केले होते. डोकलाममध्ये तर सत्तर दिवसांपेक्षा जास्त काळ दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने ठाकले होते. अरुणाचल प्रदेशचा विचार केला तर १९८७ मध्ये चीनने सुमडोरांग खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला होता, त्यावेळी भारतीय सैनिकांनी विद्युत चपळाईने चिन्यांना मागे ढकलले होते. त्या घटनेनंतर या भागात सहा वर्षे मोठा तणाव होता. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या चीन भेटीनंतर हा तणाव निवळला होता. वार्तापत्र तेव्हापासून एकमेकांना भिडायचे नाही, अशी भूमिका दोन्ही देशांनी घेतली होती. तथापि, चीनची आगळीक त्यापुढेही सुरूच राहिली. भारताला कमजोर करण्यासाठी चीनने पाकिस्तानचाही पुरेपूर वापर चालविलेला आहे, हे लपून राहिलेले नाही. जबरदस्तीने आणि एकतर्फी सीमा बदलण्याचे चिनी कारस्थान त्याच्या अन्य शेजारी देशांसोबतही सुरू आहे. यामुळेच चीनसोबत संबंध ठेवण्यास पाकवगळता अन्य देश फारसे उत्सुक नाहीत. जागतिक व्यापारात मोठी उडी घेतल्यापासून चीन विस्तारवादाच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेला आहे.

त्यातून त्याने श्रीलंका, पाकिस्तानसह कित्येक आफ्रिकन देशांना आपले मांडलिक बनविले आहे. चीनपासून असलेल्या धोक्याची जाणीव उशिराने का होईना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसह युरोपमधील विकसित देशांना झालेली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून आपले बस्तान गुंडाळत आहेत. चीनला पर्याय म्हणून जागतिक गुंतवणूकदार मोठ्या आशेने भारताकडे पाहत आहेत. यामुळेही चीनचा जळफळाट सुरू आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून डोकलाम आणि गलवानसारख्या मोठ्या घटना घडल्या आहेत. यानंतर भारताने चीनसोबतच्या संबंधाकडे जास्त सावधपणे पाहावयास सुरुवात केली आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक, लष्करी क्षमता वाढविणे, तर दुसरीकडे चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न, असे दुहेरी धोरण मोदी सरकारने अंगीकारले आहे.
जागतिक व्यापारातील चीनची मक्तेदारी मोडून काढण्याचा अमेरिका आटोकाट प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाला रशिया वगळता इतर प्रमुख देशांची साथ आहे. चीनची मक्तेदारी मोडण्यासाठी भारताने अमेरिकेच्या हातात हात मिळवणे आवश्यक आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजना राबवून मोदी सरकार देशाला स्वावलंबी बनवू पाहत आहे. मात्र, हे प्रयत्न तितके पुरेसे नाहीत. विशेषतः निर्मिती क्षेत्रात देशाला उत्तुंग झेप घ्यावी लागणार आहे. सीमेवर चीन वारंवार आगळीक करीत असला तरी त्याला भारतासोबत व्यापारी संबंध हवे आहेत. याचे कारण भारताची प्रचंड बाजारपेठ हे आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी त्या देशातून केल्या जाणाऱ्या आयातीलाही लगाम घालावाच लागणार आहे.

बिथरलेला पाकिस्तान…
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून वाभाडे काढल्यापासून पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तान हे जगभरातील दहशतवादाचे उगमस्थान असून, ओसामा बिन लादेनला लपवून ठेवणाऱ्या पाकची दहशतवादाच्या मुद्दयावर बोलायची पात्रता नसल्याची टिपणी जयशंकर यांनी केली होती. जयशंकर यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो तसेच राज्यमंत्री हीना रब्बानी खार यांनी भारतावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीची टीका चालवली आहे. स्वतःच्या अंगणात दहशतवादाचा विषारी साप पाळलेल्या पाकला आता तोच साप डंख मारू लागला आहे. दहशतवाद, आर्थिक दिवाळखोरी, चीनचे प्रचंड कर्ज, तालिबान्यांकडून सुरू असलेले हल्ले यामुळे पाकिस्तान अक्षरशः बेजार झालेला आहे. दहशतवादी पाकचे खरे रूप जगासमोर आलेले आहे. उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
असलेल्या पाकिस्तानची सावरण्याची क्षमतादेखील हळूहळू संपत चालली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news