

पुणेः सॅनिटायझर खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चौघांनी एका औषध विक्रेत्याला मारहाण करत लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी चौघा अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रमेश अर्जून वाणी ( 42, रा. केशननगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास वडगावशेरी परिसरातील मेडीप्लस नावाच्या औषधविक्रीच्या दुकानात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेडीप्लस या औषध विक्रीच्या दुकानात काम करत असताना, एक व्यक्ती सॅनिटायझर खरेदीच्या बहाण्याने तेथे आला. फिर्यादींनी त्याला सॅनिटायझर दाखविले. मात्र, त्याने 50 लिटर सॅनिटायझर हवे असल्याचे सांगून बाहेर थांबलेल्या आपल्या मॅनेजरशी बोलण्यास सांगितले. फिर्यादींना ग्राहक वाटल्यामुळे ते बाहेर येऊन आरोपीसोबत बोलत होते. त्यावेळी दोघा आरोपींनी फिर्यादींना बोलण्यात गुंतवून हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. तर अन्य एका आरोपीने दुकानात शिरून 14 हजार 920 रुपये जबरदस्तीने चोरी केले. फिर्यादींनी आरडा-ओरडा करेपर्यंत आरोपींनी तेथून पळ काढला होता.