समृद्धी महामार्ग : उद्यापासून शिर्डीला जा अवघ्या ४० मिनिटांत | पुढारी

समृद्धी महामार्ग : उद्यापासून शिर्डीला जा अवघ्या ४० मिनिटांत

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गाचा नागपूर – शिर्डी हा पहिला टप्पा रविवारपासून वाहतुकीस खुला होत आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील साईभक्तांना याचा विशेष लाभ होणार आहे. वैजापूर व श्रीरामपूरमार्गे आदळ- आपट करीत चार तासांत शिर्डीत जाण्याच्या जाचातून भाविकांची सुटका होणार असून, सावंगी इंटरचेंजपासून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डी गाठता येणार आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या सहापदरी ५२० कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हसूल सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव (लासूर स्टेशन) आणि जांबरगाव (वैजापूर) येथे समृद्धी महामार्गावर इंटरचेंज असणार असून, तेथून समृद्धी महामार्गावर ये-जा करता येणार आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातून दररोज शेकडो साईभक्त शिर्डीस जातात. जालना येथून सध्याच्या मार्गाने शिर्डीचे अंतर सुमारे १९० कि.मी. आहे. औरंगाबादहून श्रीरामपूर व वैजापूरमार्गे शिर्डीस जाता येते.

वैजापूरमार्गे औरंगाबाद ते शिर्डी श्रीरामपूरमार्गे जाण्यासाठी चार तास लागतात. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, वाहनधारक हा मार्ग टाळण्याचे प्रयत्न करतात. औरंगाबादहून नेवासा, वैजापूरमार्गे औरंगाबाद ते शिर्डी श्रीरामपूरमार्गे शिर्डीस जाण्यास साडेतीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. नेवासा फाटा ते बाभळेश्वर पर्यंतचा रस्ता एक पदरी असून, त्यावर नेहमी वर्दळ असते. समृद्धी महामार्गामुळे हे दोन्ही मार्ग टाळून औरंगाबादकरांना अवघ्या ४० मिनिटांत शिर्डी गाठणे शक्य होणार आहे.

सावंगी इंटरचेंजपासून शिर्डीचे अंतर अवघे ९९ कि.मी. आहे. समृद्धी महामार्गावर ताशी १२० कि.मी. या वेगाने वाहने धावतील. त्यामुळे सावंगी इंटरचेंजपासून अवघ्या ४० मिनिटांत शिर्डी गाठता येईल. जालना जिल्ह्यातील भाविकांना जालन्याजवळील इंटरचेंजपासून समृद्धी महामार्गावर येता येईल. तेथून दीड तासांत शिर्डी गाठणे शक्य होईल. आंध्र प्रदेश, तेलंगणातील भाविक शिर्डीला जाण्यासाठी प्रामुख्याने रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र, अनेकजण स्वतःच्या वाहनाने शिर्डीला जाताना घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुतीचे दर्शन घेत वेरूळ लेणी व दौलताबाद किल्ल्यास भेट देतात. आंध्र व तेलंगणाच्या भाविकांची यामुळे सोय झाली आहे. नागपूर ते शिर्डी अंतर १३ तासांऐवजी पाच तासांवर येणार असल्याने विदर्भातील भाविकांनाही दिलासा मिळणार आहे.

Back to top button