पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड (Pimpri) भाजपमधील अनेकजण माझ्या संपर्कात आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय वर्तुळातील चर्चेला दुजोरा दिला आहे. निवडून येण्याची क्षमता आहे, अशांचेच आम्ही इनकमिंग करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, "पिंपरी (Pimpri) महापालिकेत आम्ही ज्या पद्धतीने विकास केला तो सर्वज्ञात आहे. मात्र, गेल्या वेळेला आम्हाला विरोधात बसावे लागले. गत निवडणुकीवेळी मोदी साहेबांची हवा होती, राज्यातही भाजपची सत्ता होती. या सत्तेचा दुरुपयोग त्यांनी कशा पद्धतीने केला, वार्ड रचनेपासून इतर गोष्टी करताना कशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले गेले, हे आत्ता आम्ही सत्तेवर आल्यावर आमच्या निदर्शनास येत आहे."
या पूर्वीही इतर पक्षातून राष्ट्रवादीत आलेल्यांना आम्ही विविध पदे देऊन सामावून घेतले, त्यांचा सन्मान राखला, असे सांगताना पवार म्हणाले, "आम्ही साधूसंत नाही, आम्हीही राजकारणीच आहोत. महापालिकेत संख्याबळ वाढवून मॅजिक फिगर गाठण्यासाठी जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत, यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे."
भाजपचे अनेकजण माझ्या संपर्कात आहेत. मात्र, निवडून येण्याची क्षमता असणार्यांना आम्ही पक्ष प्रवेश देणार आहोत. इनकमिंग करताना कोणाचे नुकसान होणार नाही, याची खबरदारीही घेत आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.