न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाकडे 60 बिटकॉईनच्या खंडणीची मागणी | पुढारी

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाकडे 60 बिटकॉईनच्या खंडणीची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने ईमेलद्वारे तब्बल 60 बिटकॉईन म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधीत बिल्डरने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधीत ईमेलधारक व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीत ब्रॅंड हेड म्हणून काम करणार्‍या महिलेनी संबंधीत आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर पासून सुरू आहे.

फिर्यादी ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत 2017 पासून बँड हेड म्हणून काम करतात. त्यांच्याकडे कंपनीच्या चेअरमन तसेच इतर ईमेल तपासणे व ईमेल पाठविण्याचे काम आहे. दि. 29 रोजी फिर्यादी हे त्यांचे काम करत असताना त्यांना एका ईमेल आयडीवरून तीन वेगवेगळ्या कंपनीसंबंधीत ईमेलवर मेल प्राप्त झाले. त्यामध्ये ईमेल करणार्‍या आरोपीने कंपनीचे चेअरमन यांचे खासगी फोटो सामाजिक माध्यमांवर शेयर करण्याची तसेच कंपनीतील अधिकारी, माध्यम प्रतिनिधींसह इतरांना टॅग करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच बदनामी टाळायची असल्यास 60 बिटकॉईनची म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची मागणी करण्यात आली.

हा सर्व प्रकार गंभीर असल्याने फिर्यादी यांनी चेअरमन यांना याबाबत कळवीले. त्यावर त्यांनी ‘कोणीतरी खोडसाळपणा करत असेल त्याकडे दुर्लक्ष करा’ असे सांगितले. त्यानंतर 30 तारखेला त्यांना पुन्हा दुपारी ईमेल प्राप्त झाला. त्यानंतर पुन्हा आठ वाजता आणखी एक मेल आला. त्यावर ‘त्यांना माझ्या संयमाची वाट पाहू नका’ म्हणत चेअरमन यांचे खासगी फोटो पाठवून 60 बिटकॉईनची मागणी करण्यात आली. तसेच 5 बिटकॉईन तात्काळ पाठविण्याची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. तसेच 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेपर्यंत एका वॉलेटवर 60 बिटकॉईनची खंडणी पाठविण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर संबधीत बिल्डरने (चेअरमनने) तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यासंबंधीत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. बी. जाधव, सुभाष माने यांच्यासह शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सायबर पथक गुन्ह्याचा तपास करत आहे.

 बांधकाम व्यावसायिकाला फोटो व्हायरल करून ईमेलवरून तब्बल 60 बिटकॉईन खंडणी स्वरूपात मागितल्याचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर तो गुन्हा आमच्या पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आमची सायबर टीम करत आहे.
                       – अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे.

खंडणी स्वरूपात मागण्यात आलेल्या 60 बिटकॉईनची सध्याच्या बाजारभावानुसार 8 कोटी 30 लाख 40 हजार रूपये किंमत आहे. तर एक बिटकॉइनची आजच्या बाजारभावानुसार किंमत ही 13 लाख 84 हजार 27 रूपये आहे.

Back to top button