पुणे : आर्ट कॅफे तरुणाईच्या हक्काचा कट्टा | पुढारी

पुणे : आर्ट कॅफे तरुणाईच्या हक्काचा कट्टा

सुवर्णा चव्हाण

पुणे : पुण्यात आर्ट कॅफेजची नवी संकल्पना रुजत आहे. खासकरून असे कॅफेज तरुणाईसाठी हक्काचा कट्टा बनले आहेत. बुक कॅफे, म्युझिक कॅफे, बॉलिवूड कॅफेसह चित्रकला, नृत्य आणि कवितांवर आधारित… अशा विविध थीमवर आधारित आर्ट कॅफेची संख्या पुण्यात वाढली आहे. हे कॅफे युवा कलाकारांच्या पसंतीस उतरत आहेत. चहाचा आस्वाद घेत चित्रकला, वाचन आणि लाइव्ह संगीताच्या दुनियेत रममाण होण्यासह अशा कॅफेमध्ये कलेचे सादरीकरण करायलाही कलाकारांना मिळत आहे. त्यांच्यासाठी असे कॅफे व्यासपीठ बनले आहेत.

आर्ट कॅफे म्हणजे काय ?
कॉफीचा घोट घेत, मॅगी-पास्ताचा आनंद लुटत अन् बॅकग्राऊंड म्युझिक ऐकत… अशा कॅफेजमध्ये आपण गेलाच असाल… परंतु या पलीकडे विविध कलांवर आधारित अन् कलेचे सादरीकरण करता यावे, यासाठी व्यासपीठ निर्माण करणारे कॅफे म्हणजे आर्ट कॅफे. येथे आपल्याला चहा-कॉफीसह लज्जतदार खाद्यपदार्थ मिळतात.

कलेवर आधारित कॅफेची रचना…
आर्ट कॅफेमध्ये विविध कलांवर आधारित इंटेरिअर, डिझाईन अन् सजावट केलेली दिसेल. उदा. संगीतावर आधारित कॅफे असेल तर तिथे विविध संगीतकारांची पोस्टर्स, फोटो फ्रेम्स, चित्रे, आर्टिफिशिअल वस्तू अन् तशीच कॅफेची अनोखी सजावट केलेली पाहायला मिळेल. याशिवाय कॅफेंमध्ये कलाकारांच्या सादरीकरणासाठी छोटा रंगमंचही असतो आणि त्याला अनुसरून बैठक व्यवस्थाही पाहायला मिळेल.

असे कॅफे पुण्यात कुठे अन् किती ?
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुण्यात ऑर्ट कॅफेची संकल्पना रुजते आहे. हळूहळू ठिकठिकाणी आर्ट कॅफे निर्माण केले जात आहेत. पुण्यात दीड हजारांहून अधिक कॅफे आहेत. त्यातील 50 ते 60 आर्ट कॅफे आहेत. कोरेगाव पार्क, कॅम्प, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, प्रभात रस्ता, कोथरुड, विमाननगर, औंध, हिंजवडी, खराडी अशा ठिकाणी असे आर्ट कॅफे पाहायला मिळतील.

पुण्यात सुमारे दीड हजार कॅफे आहेत. त्यातील बरेच आर्ट कॅफे संकल्पनेवर आधारित आहेत. खासकरून तरुणांची गर्दी अशा कॅफेमध्ये पाहायला मिळेल. कवितांपासून ते चित्रकलेवर आधारित कॅफे पुण्यात असून, खाद्यपदार्थांसह तरुणाईला येथे विविध कलांचा आनंदही लुटता येतो.
                         – किशोर सरपोतदार, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स असोसिएशन

पुण्यात आर्ट कॅफेची संख्या वाढत आहे. तरुणांसाठी अशा कॅफेची निर्मिती करीत आहेत. आमचे संगीतावर आधारित कॅफे असून, त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे.

                                                  – मोहम्मद सैफ, कॅफेचालक

 

 

Back to top button