औरंगाबाद : … अशा घटना रोखण्यासाठी शिस्त हाच पर्याय | पुढारी

औरंगाबाद : ... अशा घटना रोखण्यासाठी शिस्त हाच पर्याय

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : रिक्षाचालक अश्लील बोलत असल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी विद्यार्थिनीने रिक्षातून उडी मारल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली व आता एकतर्फी प्रेमातून स्वतः पेटवून घेत, विद्यार्थिनीला मिठी मारत तरुणाने आपले आयुष्य संपविल्याची घटना सोमवारी घडली. त्यात तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने शहर हादरले आहे.

मुली महाविद्यालयात सुरक्षित आहे का ? त्यांनी शिक्षण घ्यावे की नाही ? घराबाहेर पडावे की नाही ? खरेच मुलींसाठी शहर धोकादायक बनत चालले आहे का ? असे प्रश्न या घटनांमुळे ऐरणीवर आले आहेत. यावर मानसोपचारतज्ज्ञ, समाजसेविका व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी दैनिक पुढारीने चर्चा केली असता, विद्यार्थ्यांचे समुपदेशन व्हायला हवे, शिस्त लावयाला हवी, मैत्री व प्रेम यांतील फरक मुलांना समजायला हवा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी असे काहीतरी टोकाचे निर्णय घेण्याआधी आपल्या भावना व्यक्त करायल्या हव्यात, तरच काही तरी मार्ग यावर निघू शकतो. अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांचे नेहमी समुपदेशन करायला हवे. मुलींना कोणी त्रास देत असेल, तर त्यासाठी तक्रारपेटी ठेवावी व तक्रारींची दखल घेतली जावी.                                                                       – नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

अशा घटना घडू नये, तसेच शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत आयकार्ड, गणवेश सक्तीचा करावा. इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. मुलींसाठी महिला सेलही असावा. पोलिसांचेही सहकार्य असावे जेणेकरून वाईट प्रवृत्ती असलेल्यांना क बसेल.
– प्रा. संजय गायकवाड, माजी सिनेट सदस्य (स. भु. महाविद्यालय)

 

 

आजच्या तरुणाईने आपली प्रेमाची व्याख्या एकदा नीट पडताळून पाहायला हवी. प्रेम आणि आकर्षणातला फरक लक्षात घ्यायला हवा. ‘तू मेरी नही हुई तो किसी और की नही हो सकती’ हा विचार म्हणजे प्रेम असत नाही, तर हा संकुचित आणि कोत्या मनाचा विचार आहे. प्रेमात स्वातंत्र्य, एकमेकांच्या भावनांचा आदर, विश्वास, जबाबदारीचे भान असते. त्याही पलीकडे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आनंद असतो, जबरदस्ती नाही. आकर्षणात मात्र सगळे वरवर असते. हो ला हो करणे. तिसऱ्या व्यक्तीशी बोललेले चालत नाही, अविश्वास, इनसिक्युअर वाटत राहते. प्रेमाच्या नावाखाली अनेक गोष्टींचे अट्टहास असतात. त्यामुळे ज्याला आपण प्रेम समजतोय, ते नेमके काय आहे, ते आधी समजून घ्यायला हवे.

-डॉ. निशिगंधा व्यवहारे, मानसोपचार तज्ज्ञ

जीवनातील एकेक क्षण हा मुलींसाठी भय निर्माण करणारा ठरत आहे. आता हे भय मुलींनी घराबाहेर पाय ठेवण्यापर्यंत पोहोचले आहे. मैत्री कुणाशी करावी, मैत्री काय असते, हे समजून घेणे गरजेचे आहे. मुला- मुलींनी मैत्री स्वीकारताना कितपत मोकळेपणा ठेवावा, हे लक्षात ठेवून मैत्री स्वीकारावी. समोरच्याला मैत्रीतही थांबायचे असेल, तर दुसऱ्याने त्याचा आदर करावा व ते स्वीकारावे. सध्या समाजात शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, रोजगार नाही, कुठेतरी समाज विसकटलेला वाटतो, त्यातूनच अशा विकृत प्रवृत्ती उदयाला येतात. मैत्री यांविषयक असणारी भूमिकाही परिणामकारक ठरत आहे. जिथे पहिली तक्रार येते, ती व्यवस्थेने गांभीर्याने घ्यायला हवी. ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्याला वेळीच समज देणे गरजेचे आहे.

  – रश्मी बोरीकर, समाजसेविका.

 

 

Back to top button