राजधानी दिल्‍लीतल्‍या प्रदूषणात वाढ; वायू गुणवत्‍ता निर्देशांक निकृष्‍ठ श्रेणीत | पुढारी

राजधानी दिल्‍लीतल्‍या प्रदूषणात वाढ; वायू गुणवत्‍ता निर्देशांक निकृष्‍ठ श्रेणीत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा अत्यंत निकृष्ठ श्रेणीत नोंदवण्यात आला. राज्यातील काही भागातील एक्यूआय गंभीर श्रेणीत पोहचला आहे. आनंद विहार परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री एक्यूआय ४६४ नोंदवण्यात आला. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्चच्या (सफर) आकडेवारीनूसार शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील सरासरी एक्यूआय अत्यंत खराब श्रेणीत ३०९ पर्यंत पोहचला.

मिळालेल्या माहितीनूसार दिल्ली विद्यापीठ परिसरातील एक्यूआय ३५५ नोंदवण्यात आला. यासोबत एनसीआरमधील नोएडात ३९२ आणि गुरूग्राममध्ये ३१३ एक्यूआय नोंदवण्यात आला. २४ ऑक्टोबर पासुनच दिल्लीतील हवेची गुणवत्ता घटली आहे. एक्यूआय खराब आणि अत्यंत खराब श्रेणीत पोहचला आहे. दिवाळी नंतर २५ ऑक्टोबरला दिल्लीतील एक्यूआय ३१२ नोंदवण्यात आला होता. गतवर्षीच्या दिवाळीनंतर दुसऱ्यांदा एवढा कमी एक्यूआय नोंदवण्यात आला. यापूर्वी २०१८ मध्ये दिवाळीत दिल्लीतील एक्यूआय २८१ नोंदवण्यात आला होता.

औद्योगिक तसेच वाहनांचे प्रदूषण, बांधकाम, दिवाळीतील आतषबाजी, वातावरणातील बदल तसेच आजूबाजूच्या राज्यात पिकांच्या काढणीनंतर शेतात उरलेले पाचट जाळण्यात येत असल्याने दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढते. दिल्लीत हिवाळ्यात होणाऱ्या एकूण प्रदूषणापैकी ४६% वायू प्रदूषण शेतातील पाचट जाळल्याने होते. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी त्यांच्या शेतातील पाचट मोठ्याप्रमाणात जाळत असल्याने दिल्लीतील समस्येत वाढ होते.

राज्य सरकारांच्या अनेक प्रयत्नांनंतर देखील हे प्रकार सुरूच आहेत. प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी यावर्षी दिल्ली सरकारने विशेष पावले उचलली आहेत. दिवाळीतील फटाक्यांवरील बंदीचा प्रभावी पद्धतीने क्रियान्वय करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांतर्गत २१० पथकांची नेमणूक केली आहे. तर, महसूल विभागाने १६५ पथके आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने ३३ पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांकडून प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

हेही वाचा :  

Back to top button