भाषेपेक्षाही प्रभावी आहेत हावभाव | पुढारी

भाषेपेक्षाही प्रभावी आहेत हावभाव

न्यूयॉर्क : भाषा आणि हावभाव यांचा जवळचा संबंध आहे. संवादाचा समोरील व्यक्तीवर किती प्रभाव पडतो, हे आपल्या हावभावावरूनही समजू शकते. कमजोर भाषेलाही ‘बॉडी लँग्वेज’मुळे प्रभावी बनवले जाऊ शकते. याबाबत आता एक नवे संशोधन झाले आहे.

अमेरिकेतील वेंडरबिट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या शेरिस क्ला यांनी सांगितले की, बॉडी लँग्वेज ही श्रोता आणि वक्ता यांच्या दरम्यान सेतूसारखी आहे. ती एकमेकांना जोडून ठेवते. संशोधिका मेलिसा सी डफ यांनी सांगितले की, अल्झायमरच्या रुग्णांना बॉडी लँग्वेज बरीच साहाय्यक होते. आपले हात बोलण्याच्या तीव्रतेनुसार हालचाल करतात. आपण शांत आहोत की रागात, हे एखाद्याला दूरवरूनच आपल्या हातांच्या हालचाली पाहून समजू शकते. शिक्षकही वर्गात अध्यापन करीत असताना बॉडी लँग्वेजचा चांगला उपयोग करीत असतात. भाषण देत असताना एखादा राजकीय नेताही असेच करीत असतो. भाषा शिकण्यापूर्वी मुलांच्या हावभावावरूनच आपण त्यांचे मन जाणून घेऊ शकतो. ज्यांना बोलता येत नाही, त्यांच्याबाबतही हे खरे आहे.

आपण ज्यावेळी काही बोलत असतो त्यावेळी आपल्या डोळ्यांमध्येही ते भाव उमटत असतात. भाषा सहजपणे बदलली जाऊ शकते; पण बॉडी लँग्वेज बदलणे कठीण आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Back to top button