

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : साखर उत्पादनावर साखर कारखान्यांचे अर्थकारण चालू शकत नाही, हे ओळखून कारखान्यांनी साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा एक भाग म्हणजे सहवीज प्रकल्प होय. गेल्या हंगामात कोल्हापूर विभागातील 22 साखर कारखान्यांकडील सहवीज प्रकल्पांतून वीज निर्मिती करण्यात आली. त्यात एकूण 167 कोटी 66 लाख युनिट वीज उत्पादित झाली. ही वीज कारखान्याच्या कामासाठी वापरून उर्वरित वीज महावितरणाला विक्री करण्यात आली आहे. त्यातून या कारखान्यांना एकूण 691 कोटी 76 लाख 68 हजार 136 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
साखर कारखान्यातून साखर, बगॅस, मळी, सहवीज प्रकल्प आणि इथेनॉल या पाच प्रकारची उत्पादने घेतली जात आहेत. कोल्हापूर विभागातील 36 साखर कारखान्यांपैकी 22 कारखान्यांनी सहवीज प्रकल्प उभा केले आहेत. काही कारखान्यांनी सहवीज प्रकल्प उभारणीबाबत नियोजन केले आहे.
कारखान्यांना सहवीज प्रकल्पांची गरज
ऊस गाळपामधून जो बगॅस बाहेर पडतो, तो कारखान्यांना विक्री करावा लागत होता. अशा चिपाडापासून कारखान्यांना जेमतेम भाव मिळत होता. यासाठी तंत्रज्ञान विकसित झाले. त्यातून सहवीज प्रकल्प उभारू लागले आहेत. देशात खासगी कारखान्यांचे सहवीज प्रकल्प जास्त आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारांनीही त्यामध्ये शिरकाव करून जास्तीत जास्त वीजनिर्मिती करून शेतकरी सभासदांना एफआरपीच्या माध्यमातून त्याचा लाभ देण्यात येत आहे.
विजेचा वापर
गेल्या गळीत हंगामात कोल्हापूर विभागातील 22 कारखान्यांनी 167 कोटी 66 लाख 68 हजार 242 युनिट वीज निर्मिती केली आहे. त्यातील कारखान्यांनी स्वत:साठी म्हणून 61 कोटी 62 लाख 16 हजार युनिटचा वापर केला, तर 105 कोटी 90 लाख 21 हजार युनिट वीज महावितरणला विक्री करून आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील 9 सहकारी व 5 खासगी, तर सांगलीतील सहकारी 6 व खासगी 2 अशा 22 कारखान्यांकडे सहवीज प्रकल्प आहेत. यातील सर्वांत जास्त वीजनिर्मिती दत्त शिरोळ काखान्याने केली आहे (16 कोटी 36 लाख युनिट). सर्वात कमी मोहनराव शिंदे साखर कारखाना आरग-सांगली या कारखान्याने 2 कोटी 52 लाख 54 हजार 200 युनिट वीजनिर्मिती केली आहे.
वीज निर्मितीने कारखान्यांना उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण झाला आहे. यातून सहकारी साखर कारखानदारीला नवीन आयाम प्राप्त होत आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांची वीजनिर्मिती
(आकडे युनिटमध्ये)डी. वाय. पाटील-गगनबावडा – वीजनिर्मिती 5.69 कोटी, वारणा – वीज निर्मिती 14.54 कोटी, कुंभी कारखाना – वीजनिर्मिती 4.73 कोटी, सदाशिवराव मंडलिक कारखाना – वीजनिर्मिती 40.76 कोटी, बिद्री कारखाना – वीज निर्मिती 6.89 कोटी, दत्त शिरोळ – वीजनिर्मिती 16.36 कोटी, जवाहर हुपरी – वीजनिर्मिती 7.21 कोटी, शाहू कागल – वीजनिर्मिती 7.65 कोटी, गुरुदत्त टाकळी – वीजनिर्मिती 6.77 कोटी, सरसेनापती संताजी घोरपडे – वीजनिर्मिती 11.50 कोटी, शरद नरंदे – वीजनिर्मिती 3.56 कोटी युनिट.