सातारा : शिरवळमधील पुलांखाली पाणीच पाणी | पुढारी

सातारा : शिरवळमधील पुलांखाली पाणीच पाणी

शिरवळ; पुढारी वृत्तसेवा :  शिरवळमध्ये हायवेच्या दुतर्फा ये-जा करण्यासाठी असलेल्या सर्व पुलांखालील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यांबाबत असून खोळंबा अन नसून अडचण अशी गत झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच पाण्यामध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. यासाठी रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वाढते उद्योगधंदे यामुळे शिरवळला विशेष महत्त्व आले आहे. रोजगार वाढीमुळे लोकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील स्थनिक नागरिक, कामगार, प्रवाशी या सर्व लोकांना हायवे खाली असलेल्या पुलाच्या खराब रस्त्यामुळे अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. हायवेच्या दोन्ही बाजूला राहणार्‍या रहिवाशांना तसेच परिसरातील नागरिकांना, प्रवाशांना, कामगारांना ये-जा करणे सोयीस्कर व्हावे यासाठी शिरवळमध्ये 4 पूल बांधले आहेत. मात्र, या चारही पुलाखालच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून त्यावर एक ते दीड फुटाचे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात एका बाजूच्या सर्व्हिस रोडची देखील अवस्था खराब झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेवून वावरत आहेत. पादचार्‍यांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या अनेक भागात पाऊस सुरू असल्याने पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे.

या चारही पुलाखालचे रस्ते हे खड्ड्यात बांधले गेल्याने सखल भागात पाणी लगेच भरते. त्यात मागील 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तर या सर्व पुलाखालच्या रस्त्यांमध्ये पूर्णपणे पाणी साचत आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने पाण्यातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे.

Back to top button