पैठण: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या अगोदरच शिवसैनिकांनी उरकले नाथसागर धरणाचे जलपूजन

पैठण; पुढारी वृत्तसेवा(चंद्रकांत अंबिलवादे): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा पैठण येथे १२ सप्टेंबरला नियोजित दौरा आहे. नाथसागर धरण हे मराठवाड्यासाठी एक वरदान आहे. जलपूजन करून श्रेय मुख्यमंत्र्यानी घेऊ नये म्हणून, हा कार्यक्रम ठाकरेंच्या शिवसेनेकडून आधीच उरखून घेण्यात आला आहे. श्रेय घेण्याच्या धास्तीने ठाकरे गटाचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व त्यांच्या पत्नी वैजयंती खैरे यांच्या हस्ते जलपूजन व आरती करण्यात आली. यावेळी पुरोहित सुयश शिवपुरी हे उपस्थित होते.
पैठण येथील नाथसागर धरण शंभर टक्के भरल्याने, धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. हा कार्यक्रम ठाकरे गटाचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.८) दुपारी करण्यात आले. यावेळी औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती होती. या जलपूजन कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी व महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
गुरुवारी दुपारी सामान्य पर्यटकांसाठी बंदी असलेल्या धरणाच्या थेट भिंतीवर शिवसेना नेत्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी जमा होऊन जलपूजन कार्यक्रम घेण्यात आला. परंतु जलपूजन कार्यक्रमासंदर्भात पाटबंधारे विभागाला रात्रीबारा वाजेपर्यंत कुठलीही माहिती नव्हती. माहिती मिळाल्यानंतर धरण शाखा अभियंता विजय काकडे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
दरम्यान नाथसागर धरणावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिक होते. याप्रसंगी तालुका प्रमुख मनोज पेरे, माजी तालुकाप्रमुख सोमनाथ जाधव, महिला आघाडीच्या प्रमुख राखीताई परदेशी, माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, रमेश खांडेकर, पुष्पा वानोळे, मंगल मगर, अजय परळकर,अॅड किशोर वैद्य, डॉ.चौधरी यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.