भावीनिमगावमध्ये बिबट्याचे वाढते हल्ले | पुढारी

भावीनिमगावमध्ये बिबट्याचे वाढते हल्ले

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा :  भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथे बिबट्याने दहशत निर्माण केली असून, आतापर्यंत 6 शेळ्यांना व एका पाळीव कुत्र्यावर हल्ले करून शिकार बनविले आहे. गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा भावीनिमगाव परिसरात मुक्काम असून, पाळीव प्राण्यांचे बळी जात आहेत. याची दखल घेऊन सरपंच आबासाहेब काळे यांनी वनविभागास तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. बुधवारी दुपारी काळे, जाधव, ओहळे वस्ती शेजारच्या उसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी भावीनिमगाव/मठाचीवाडी शिवारात धोंडे वस्तीवर पाळीव कुत्रा व शेळीला शिकार बनवत बिबट्याने आपले अस्तित्व दाखविले. त्याच्या दुसर्‍या दिवशी शेजारच्या दत्तात्रय गायधने यांच्या शेळीवर हल्ला केला.

तिसर्‍या दिवशी शेजारच्या सुकळी गावात याच बिबट्याने दोन शेळ्यांना शिकार बनवले होते. नंतरच्या दोन दिवसांत बिबट्याने कुठेही हल्ला चढवला नाही .मात्र, सोमवार रात्री भावीनिमगावच्या जायकवाडी धरणाच्या कडेला असलेल्या जाधव वस्तीजवळ असलेल्या मेंढपाळाच्या शेळीवर आणि जाधव वस्तीवरील नवनाथ किसन जाधव यांच्या शेळीवर हल्ला करून दोन शेळ्यांना शिकार बनवले. मंगळवार रात्री शेजारच्या हरिभाऊ ज्ञानदेव काळे यांच्या वस्तीवर शेळीवर हल्ला केला, तर त्याच रात्री शेजारच्या बाळासाहेब रंगनाथ काळे यांच्या शेळीवर हल्ला केला. सर्व हल्ल्यात शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. पिंजरा लावला असला, तरी बिबट्या या हिंस्र प्राण्यापासून शेतीत काम काज करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन सरपंच आबासाहेब काळे यांनी केले आहे.

तीन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती
तीन वर्षांपूर्वी अशीच दहशत करून बिबट्याने अनेक पाळीव प्राणी आपले शिकार बनविले होते. त्यावेळी पिंजरा मागवून शेतकरी मिलिंद कुलकर्णी यांच्या केळी बागेत बिबट्यास जेरबंद केले होते. आताही तसीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ले वाढल्याने पिंजरा लावण्यात आहे.

Back to top button