औरंगाबाद : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप | पुढारी

औरंगाबाद : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत पोलिस अधिकारी व कर्मचारी हप्ते घेत असल्यामुळेच अवैध धंदे फोफावले, असे वक् तव्य केल्याबद्दल गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीला आ.रत्नाकर गुट्टे, एसडीएम सुधीर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेणिक लोढा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आ. गुट्टे यांनी शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याचा मुद्दा जाहीरपणे उचलला. गंगाखेडच्या निरीक्षक व बीट जमादारावर थेट हप्तेखोरीचा आरोप केल्याने वातावरण तापले होते. समाज माध्यमांवर हा प्रकार जाहीरपणे उघड झाल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याचे नमूद करताना बैठकीतील विषय सोडून पोलिस अधिकारी व अंमलदारांविषयी नकारात्मक प्रतिमा तयार करण्याबरोबरच पोलिस प्रशासनाची जनतेमधील प्रतिमा मलीन करण्याचे काम भाषणातून केल्याचा ठपका ठेवत आ.गुट्टे यांच्या विरोधात मंगळवारी उशिरा गंगाखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्य बोचल्याने गुन्हा दाखल गंगाखेड शहरासह तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे बंद केले तर 70 टक्के क्राईम आपोआपच थांबेल. या चांगल्या हेतूने लोकप्रतिनिधी या नात्याने पोलिसांचे सत्य उघड केले. सत्य उघड केल्यानंतर संतापलेल्या पोलिस अधिकार्‍यांचे माझ्या अंगावर धावून येणे हाच मुळात धक्कादायक प्रकार होता. पोलिस अधिक्षक व अन्य अधिकारी अवैध धंद्यांना उघड सहकार्य करत आहेत. गंगाखेड ठाण्याच्या 100 मीटर हद्दीत अवैध गुटखा, हातभट्टी, देशीदारू आदी अवैध धंदे उघड चालतात. असे असतानाही माझ्या अंगावर धावून येत अधिकारी पुरावा मागत असतील तर हा दंडेलशाही व सरंजामशाहीचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया आ. गुट्टे यांनी दिली.

Back to top button