पिंपरी-चिंचवडसाठी अतिरिक्त फौजफाटा | पुढारी

पिंपरी-चिंचवडसाठी अतिरिक्त फौजफाटा

पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी- चिंचवड शहरात चोख बंदोबस्त तैनात आला आहे. आयुक्तालयातील मनुष्यबळ कमी असल्याने यंदा महासंचालक कार्यालयाकडून अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. यामध्ये मुंबई आणि प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्यात आले. मात्र, सुरुवातीपासूनच आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडसाठी नुकतेच 720 पोलिस शिपाई पदाची भरती देखील घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामकाजासाठी मनुष्यबळ मिळण्यास आणखी वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेशोत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या तांत्रिक बाबींवर जास्त भर दिला आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, सर्व्हेलन्स व्हॅन अशा बाबी पाहावयास मिळणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकूण एक हजार 742 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे. दरम्यानच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. नुकतेच कोम्बिंग ऑपरेशन, प्रतिबंधक कारवायांच्या माध्यमातून सुमारे दीड हजार गुन्हेगारांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तालयातील बंदोबस्त
पोलिस निरीक्षक – 46
सहायक/ उपनिरीक्षक -143
पोलिस कर्मचारी – 1312
होमगार्ड – 478
एसआरपीएफ प्लाटून – 4

महासंचालक कार्यालयाकडून पुरविण्यात आलेला बंदोबस्त
एचएसपी मुंबई – सहायक/ उपनिरीक्षक – 10
ट्रेनिंग आणि स्पेशल युनिट – सहायक/ उपनिरीक्षक – 10

Back to top button