स्वराज्य संघटना राज्यात क्रांतिकारक काम करणार : संभाजीराजे

स्वराज्य संघटना राज्यात क्रांतिकारक काम करणार : संभाजीराजे

तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील विस्थापित जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना राज्यभर काम करणार आहे. सत्ताधार्‍यांकडून प्रश्न सोडवण्यात हलगर्जीपणा झाला तर स्वराज संघटना आगामी काळात राजकारणामध्ये प्रवेश करेल, असे माजी खासदार संभाजीराजे यांनी तुळजापूर येथे जाहीर केले.

संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज या संघटनेचा लोगो आणि ध्वजाचे आज (मंगळवारी) येथे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर जाहीर सभेत बोलत होते. पाऊस आणि जय भवानी, जय शिवाजींच्या जयघोषात स्वराज पक्षाच्या लोगो आणि झेंड्याचे अनावरण झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर राज्यभरातून आलेले प्रमुख स्वराज्य संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी तुळजापूर येथील स्वराज्य संघटनेचे आबासाहेब कापसे व महेश गवळी यांनी संभाजीराजे यांचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन संभाजी राजे यांनी केले. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश गवळी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी संभाजी राजे यांनी स्वराज्य संघटनेची पंचसूत्री समजावून सांगितली. संघटनेचा झेंडा भगवा आणि पक्षाचा लोगो याचा अर्थ कार्यकर्त्यांना समजून सांगितला. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलेले विचार या संघटनेसाठी मार्गदर्शक असतील. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जे उद्देश डोळ्यासमोर ठेवले होते, त्यांना समोर ठेवून स्वराज्य संघटना आगामी काळात महाराष्ट्रात काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यासाठी आपण स्वतः दौरे करणारा असून चिरंजीव युवराज शहाजीराजे हे देखील या कामाला पुढे घेऊन जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

स्वराज्य संघटनेची पहिली शाखा आपण तुळजापुरात स्थापन करत आहोत. यापुढे राज्यातील प्रत्येक गावात संघटनेची स्थापना केली जाईल, असे सांगून संभाजीराजे म्हणाले काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍याला आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वराज संघटनेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली. संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा देत करण्यात आले. तत्पूर्वी संभाजी राजे यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेतला. मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले.
संभाजीराजे यांचा सत्कार तुळजापूरकरांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी जीवनराजे इंगळे, प्रशांत अपराध, अजय साळुंखे, प्रशांत सोनजी, सज्जन साळुंखे, मयूर कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पद्माकर चव्हाण यांनी स्वराज्य संघटनेसाठी 9822 रुपयांचा धनादेश छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे सुपूर्त केला. प्रवक्ते करण गायकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कांबळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादर केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news