खा. मंडलिक, माने यांच्या बंगल्यासमोर बंदूकधारी पोलिस | पुढारी

खा. मंडलिक, माने यांच्या बंगल्यासमोर बंदूकधारी पोलिस

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांच्या रूईकर कॉलनी येथील निवासस्थान व कार्यालयासमोर मंगळवारी बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी ‘वाय प्लस एस्कॉर्ड’ पथकही पुरविण्यात आले आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाल्याने राज्यात फाटाफुटीच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्हीही खासदार समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे गटातील प्रवेशाचा निर्धार केला आहे. त्यामुळे खा. मंडलिक व खा. माने कोणत्याही क्षणी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर शहर, जिल्ह्यात कोणताही अनुचित घटना घडू नये, याची कोल्हापूर पोलिस दलाने खबरदारी घेतली आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी सकाळी खा. मंडलिक व खा. माने यांच्या अनुक्रमे रूईकर कॉलनी व दीप्ती अपार्टमेंटमधील निवासस्थानासमोर बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खा. मंडलिक यांच्या रूईकर कॉलनी येथील बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने सध्या त्यांचे दिप्ती अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.

बंगल्यावरील बंदोबस्ताशिवाय दोन्ही खासदारांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी ‘वाय प्लस एस्कॉर्ड’ पथकही पुरविण्यात येत आहे. 1 पोलिस अधिकारी आणि 5 पोलिस कॉन्स्टेबलचा पथकात समावेश करण्यात आला आहे. पथकासाठी स्वतंत्र वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असेही शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

Back to top button