सोलापूर : सांगोला शहरात उदंड झाले अवैध धंदे | पुढारी

सोलापूर : सांगोला शहरात उदंड झाले अवैध धंदे

सांगोला (सोलापूर): पुढारी वृत्तसेवा :  सांगोला शहरात गेल्या काही महिन्यापासून बेकायदेशीर अवैध धंद्याचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने अवैद्य वाळू वाहतूकदेखील मोठ्या तेजीत सुरू आहे. एवढेच नव्हे, तर सांगोला पोलीस स्टेशनचे वसूलदार व पोलिसांच्या वाळू वाहतुकीच्या गाड्या असल्याची चर्चा सांगोल्यात सुरू आहे. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने सांगोल्यात अवैध धंदे जोमात असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

सांगोला शहर व तालुक्यातील नद्यांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू आहे. या वाळूच्या वाहतुकीस पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांचा आर्थिक देवाणघेवाणीतून अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा जनतेतून केली जात आहे.
कायदयाचे संरक्षकच अशा प्रकारे बेकायदेशीर धंद्यामध्ये सामील असल्याने अशा कर्मचार्‍यांवर कार्यवाही करावी. याकरिता एक संघटना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे तक्रार देखील करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सांगोला शहरात जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून या जुगारांमध्ये रोज लाखो रुपयांची उलाढाल होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचे खिसे रिकामे होत असतात. याकडे पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. या जुगाराकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने पोलिस प्रशासन त्यावरती कार्यवाही करत नसल्याचीही चर्चा सांगोला शहरातील नागरिकांमधून होत आहे. सांगोला शहरात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कल्याण,मुंबई या मटक्याचा धंदा पान टपरी वर जोमात चालु आहे.

सांगोला शहरात व तालुक्यात बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सराईतपणे होत असून याकडे संबंधित प्रशासन कोणतीच कार्यवाही करत नसल्याने गुटखा बंदी असतानादेखील गुटख्याची खुली विक्री होत असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे.

सांगोला शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बेकादेशीर अवैध धंद्याचे प्रमाण वाढल्याने अनेक कॉलेजचे तरुण, युवक हे या बेकायदेशीर व अवैध धंद्याच्या नादी लागल्याने काहीजण देणी-पाणी झाल्याने गाव सोडून गेले आहेत. तर काहीजण गाव सोडण्याच्या तयारीत असल्याने युवकांना व सर्वसामान्य लोकांना अशाप्रकारे देशोधडीस लावणार्‍या सांगोला शहर व तालुक्यातील सर्व बेकायदेशीर अवैद्य धंद्यांवर पोलिस प्रशासन कार्यवाही करण्याचे धाडस दाखवणार का? असा सवाल या निमित्ताने जनतेतून विचारला जात आहे.

Back to top button