संगमनेर : ‘त्या’ पतसंस्थेच्या लेखा परीक्षणाचे आदेश | पुढारी

संगमनेर : ‘त्या’ पतसंस्थेच्या लेखा परीक्षणाचे आदेश

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील एका नामांकित पतसंस्थेच्या मागील पाच वर्षांचे फेर लेखा परीक्षण करण्याचे आदेश जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी लेखा परीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे लेखापरीक्षण झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने या पतसंस्थेमध्ये किती कोटींचा घोटाळा झाला असल्याचे उघड होणार आहे.

संगमनेर तालुक्यात तीस वर्षांपूर्वी या पतसंस्थेची स्थापना केली होती. अत्यंत कमी कालावधीमध्ये ही पतसंस्था नावा रुपास आली होती. दोन हजारांहून अधिक सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेचा विस्तार तालुक्यातील विविध गावामध्ये केला असून या पतसंस्थेचे जवळपास 4 कोटी भाग भांडवल असलेल्या या संस्थेकडे सव्वाशे कोटींच्या ठेवी आहेत. या संस्थेने तब्बल 100 कोटींच्या कर्जाचे वाटपही केलेले आहे. शहरात स्वतःच्या मालकीच्या जागेत या संस्थेने भव्य इमारतही उभारली आहे.

या पतसंस्था गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेली आहे. या पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असल्याची दबकी आवाजात चर्चा सुरू झाली होती. संगमनेर शहरातील एका नामांकीत पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक आणि इतरांनी मोठी अफरातफर केली असल्याची वार्‍यागत सर्वत्र पसरली.

त्यामुळे अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. जास्त प्रमाणात ठेवी काढल्या मुळे ठेवीदारांना पैसे देणे अवघड झाले आहे. पतसंस्थेत अफरातफर झाल्याची  तक्रार पतसंस्थेच्या अध्यक्षांनी  जिल्हा निबंधक  यांच्याकडे केली होती. याबाबत जिल्हा निबंधक यांनी संगमनेर उपनिबंधक कार्यालयाला अफरातफरीबाबत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Back to top button