पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असताना त्यातच विना नंबरप्लेट वाहन वापरणार्या दुचाकीस्वाराला गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने सापळा लावून पकडल्यानंतर तो अट्टल वाहनचोर असल्याचे कारवाईनंतर समोर आले आहे. त्याच्याकडून गुन्हे शाखेने 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
समाधान गणपत जगताप (28, यवत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जगताप हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडून चोरीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून लोणी काळभोर, लोणीकंद, कोथरूड, यवत, कोंढवा, अलंकार, हडपसर पोलीस ठाण्यातील 9 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना संशयीत आरोपी जगताप यांच्याकडे विना नंबरप्लेट संशयित दुचाकी असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने जगतापला मांजरी परिसरात सापळा लावून पकडले. त्याच्याकडे गाडीच्या कागद पत्राबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. जगतापला अटक करून आणखी तपास केला असता गुन्हे शाखेच्या पथकाने जगतापच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल 9 दुचाकी जप्त केल्या. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.